कोयना धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून धुवांधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मुसळधार पाऊसाच्या सरीवर सरी पाणलोट क्षेत्रात सर्वदूर कोसळत आहेत. गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ५ टीएमसीने वाढ झाली आहे. (Water released from Koyna Dam)
धरणात सध्या ६६.१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात वाढलेला पावसाचा जोर व त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही मोठी आहे. यामुळे धरणाची जलपातळी वाढत आहे. अजून ३ महिने पर्जन्यकाळ शिल्लक असून वाढत जाणारी धरणाची जलपातळी धोकादायक बनू नये यासाठी कोयना प्रशासनाने धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे.
धरणाचा पायथा वीजगृहाचे १ युनिट कार्यान्वित करून त्याद्वारे नदीपात्रात १०५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. लवकरच दुसरे युनिट सुरू करून हा विसर्ग २१११ करण्यात येणार आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर धरणाच्या ६ वक्र दरवाजांना पाणी टेकणार आहे. धरण परिचालन सूचीप्रमाणे धरणाचे दरवाजे उघडून जलपातळी नियंत्रित करणार असल्याचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी स्पष्ट केले. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १६३ मिलीमीटर नवजा येथे १४५ तर महाबळेश्वर येथे १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहे. आतापर्यंत कोयनानगर येथे २७९३ मिलिमीटर, नवजा येथे ३२६५ मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे २७०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ४९४५२ कुसेक आहे. धरणाची जलपातळी २१२५.०७ फूट झाली असून धरणात ६६.१७ टीएमसी पाणीसाठा आहे.
दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता –
धरणाची जलपातळी मुसळधार पावसामुळे वाढत आहे. धरणाची वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारपासून पायथा वीज गृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. दुसऱ्या युनिटची दुरुस्ती संपल्यावर ते रात्रीपर्यंत सुरू करून नदीपात्रात २१११ क्युकेस पाणीसाठा सोडण्यात येणार आहे. धरणात ७३.५० टीएमसी पाणीसाठा आल्यावर धरणाच्या ६ वक्र दरवाजांना पाणी टेकते. त्यासाठी ७ टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर धरणाचे ६ वक्र दरवाजे उघडणार असल्याचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी स्पष्ट केले.




