पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; दोन हजार नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पिंपरी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि पवना तसेच मुळशी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या संजय गांधीनगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, जाधवघाट, किवळे आणि वाल्हेकरवाडी परिसरातील सुमारे दोन हजार नागरिकांना रात्री उशिरा महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
धरणातून विसर्ग; नदीकाठच्या घरांना धोका –
सोमवारपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे पवना धरण शंभर टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पवना आणि मुळशी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मंगळवारी रात्री पवना धरणातून १५,७७० क्युसेक आणि मुळशी धरणातून सकाळी आठ वाजल्यापासून ३१,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने नागरिकांचे स्थलांतर केले.
स्थलांतरित नागरिकांचा तपशील
पंचशीलनगर, पिंपळे निलख: १४ जणांचा समावेश असलेल्या ५ कुटुंबांना जवळच्या महापालिका शाळेत हलवण्यात आले.
लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव: ४५ जणांचा समावेश असलेल्या १२ कुटुंबांना महापालिका शाळेत स्थलांतरित केले.
संजय गांधीनगर: ७५ रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, त्यापैकी ३० जण महापालिका शाळेत स्थलांतरित झाले, तर इतर नातेवाईकांकडे गेले.
पिंपळे निलख, पंचशीलनगर: २५ जण महापालिका शाळेत हलवले गेले.
चिंचवडगाव: माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या कार्यालयाजवळच्या ४० जणांना काळेवाडी येथे स्थलांतरित केले.
रामनगर, बोपखेल: ४० जणांना महापालिका शाळेत हलवण्यात आले.
जाधवघाट: ५८ जण, वाल्हेकर शाळवाडी: १० जण, किवळे स्मशानभूमी लेबर कॅम्प: ५४० जण आणि भाटनगर: १५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
महापालिकेची तत्परता; तीन शिफ्टमध्ये काम
पाणीपातळी वाढीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी तीन शिफ्टमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन शिफ्ट्समध्ये समन्वय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
शिफ्टनिहाय समन्वय अधिकारी आणि संपर्क क्रमांक:
सकाळची शिफ्ट: संध्या वाघ, कार्यकारी अभियंता (९९२२५०१७५८)
दुपारची शिफ्ट: विजय भोजने, कार्यकारी अभियंता (९९२२५०१७६८)
रात्रीची शिफ्ट: सुनील पवार, कार्यकारी अभियंता (९९२२५०१९४८)
ध्वनीक्षेपकाद्वारे सतर्कतेच्या सूचना
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली असून, पूरपरिस्थिती उद्भवू शकणाऱ्या भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.ताम्हिणी येथे विक्रमी पाऊस
भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, ताम्हिणी येथे ५७५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे, जो यंदाच्या हंगामातील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





