Pimpri News | पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा नवा टप्पा ; ७५% शहरात मेट्रो जाळं पसरणार
प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. जलद वाहतूक व्यवस्था करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करणे आवश्यक आहे. त्यासाठीच पिंपरी चिंचवड शहरासह चाकण एमआयडीसीला मेट्रो मार्गाने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात मेट्रो टप्पा २ राबवण्यात येणार आहे.
निगडी ते चाकण या ३१ स्टेशन असलेल्या ४०.९२६ किलोमीटर अंतराच्या मार्गासाठी एकूण १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड व चाकण एमआयडीसी तसेच, हिंजवडी आयटी पार्कचा भाग मेट्रोने जोडला जाणार आहे.पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत सध्या दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो धावत आहे. या मार्गाचा निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.
दापोडी ते निगडी या एकमेव मेट्रो मार्गानंतर आता, निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते चाकण असा दुसर्या मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने डीपीआर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. सध्या असलेल्या मेट्रो मार्गिकेप्रमाणेच हा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे. त्यासाठी १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये खर्च येणार आहे.
या डीपीआरमध्ये ३१ मेट्रो स्टेशन आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक २५ स्टेशन आहेत. त्यातील नाशिक फाटा ते संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन असे १.३३६ किलोमीटर अंतराचा मार्ग तयार आहे. या नव्या मार्गासाठी तसेच, स्टेशनसाठी महापालिका ३३ कोटी रुपये किमतीची एकूण १५ हजार ९०९.६५ चौरस मीटर जागा देणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाची एकूण १ लाख ३४ हजार ८४१.८३ चौरस मीटर जागा आहे.
त्या जागेचे मूल्य ७७ कोटी ८ लाख आहे. तर, ७२ कोटी २८ लाख रूपये मुल्यांची १८ हजार ४७४.१८ चौरस मीटर क्षेत्रफळाची खासगी जागा घेण्यात येणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका सभेने मान्यता दिल्यानंतर तो डीपीआर राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. राज्य शासनाकडून तो केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. केंद्राकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष मार्गाचे काम सुरू होईल. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडचा तब्बल ७५ टक्के भागातून मेट्रो धावेल, असे अधिकार्यांनी सांगितले.
अशी धावेल मेट्रो..
निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (वायसीएमजवळ), गवळीमाता चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण
कुठे किती स्टेशन..
-पिंपरी-चिंचवड शहरात एकूण २५ मेट्रो स्टेशन
-चाकण नगरपालिका हद्दीत ६ मेट्रो स्टेशन
-एकूण अंतर – ४०.९२६ किमी.
-एकूण खर्च – १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये
असा होणार खर्च..
निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या प्रकल्पासाठी एकूण १० हजार ३८३ कोटी ८९ लाख खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चात केंद्र शासनाचा १० टक्के आणि राज्य शासनाचा १० टक्के हिस्सा असणार आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा खर्चाचा हिस्सा १५ ते २० टक्के असणार आहे. उर्वरित ६० टक्के निधी कर्जातून उभारला जाणार आहे.





