Pune District : खेडच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस

भीमा, भामा, आरळा नद्यांना पूर ः चास कमान धरणातून 18410 क्यूसेकने विसर्ग
राजगुरूनगर –खेड तालुक्यातील भीमाशंकर भोरगिरी परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने भीमा, भामा आणि आराळा नद्यांना पूर आला असून या नद्यांवर असलेली चास कमान, भामा आसखेड आणि कळमोडी धरणे भरली आहेत. चास कमान धरणातून भीमा नदीत 18410 क्यूसेक वेगाने विसर्ग केला जात असून नदी खालच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगावर कालपासून (दि. 18) संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. खेड तालुक्यातील चास कमान आणि कळमोडी धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरली आहेत तर भामा आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या तीनही धरणातून नदी पात्रात विसर्ग सडण्यात येत आहे. त्यामुळे धरणाखालील नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे.
पावसाचे प्रमाणात कमी जास्त होत आहे जिल्ह्यासह खेड तालुक्याला रेड अलर्ट आहे त्यामुळे धरणाखालील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भीमाशंकर परिसरात 24 तासात सुमारे 450 ते 500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ओढे नाले आणि धबधबे ओसंडून वाहत आहेत.
खेड तालुक्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. रिमझिम कमी जास्त पडणार्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भात पिकासाठी हा पाऊस योग्य असला तरी भाजीपाला आणि नगदी पिकांवर परिणाम करणार आहे. तालुक्यात आज सकाळीपासून सुरु झालेला संततधार पाऊस अजूनही सुरूच आहे. तालुक्यात पडणार्या पावसामुळे शेतीचे नुकसान वगळता कोणतेही नुकसान झाले नाही. जीवित हानी नाही. तालुक्याचा पश्चिम भाग वगळता पूर्व, दक्षिण उत्तर भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दळणवळण सुस्थितीत आहे.
तालुका आपत्ती व्यवस्थापन निद्रावस्थेत…
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे खेडच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर मोठा आहे. भामा आसखेड चास कमान आणि कळमोडी धरणे भरली आहेत. धरणातून कमी जास्त पाण्याचा विसर्ग होत आहे. रेड अलर्ट असताना तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन मात्र निद्रावस्थेत आहे. नागरिकांपर्यंत कोणत्याही सूचना दिल्या जात नाहीत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाही. केवळ धरण प्रशासनाकडून सोशल मीडियावर धणारतून पाणी सोडण्याबाबतची माहिती दिली जात आहे. आपत्ती कक्षाचा संपर्क क्रमांक नागरिकनपर्यंत नाही त्यामुळे मोती आपत्ती आल्यास नागरिकांनी कोणाशी संपर्क करायचा याबाबत काहीच कल्पना नसल्याने प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे





