Water cuts: पाणीकपातीबाबत आज फैसला?
Water cuts:

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीची शक्यता
Water cuts: महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे सोमवारी महापालिकेत रुजू होणार असल्याने पाणीकपातीबाबतचा चर्चा होणार आहे. दहा टक्के कपातीबाबत राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पत्र शुक्रवारी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.
पाऊस कमी पडल्याने संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीबचत केल्यास पुढच्या पावसाळ्यापर्यंत तग धरू, अशी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने १० टक्के पाणीकपातीचे नियोजन करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्था तथा अन्य ग्रामपंचायती, पंचायत समित्यांना दिले आहेत.
आधी महापौर मंजुषा नागपुरे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर परदेश दौऱ्यावर गेले. त्यानंतर आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर हेही परदेश दौऱ्यावर गेले. त्यामुळे पाण्याबाबत निर्णय घेता आला नाही.
आता ते सोमवारी रुजू होणार आहेत, त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी अथवा मंगळवारी बैठक होणार आहे. त्यामध्ये पाण्याची उपलब्धता, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठीचे नियोजन याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर महापौर, पक्षनेते यांच्याबरोबर बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेने पाणीकपातीच्या नियोजनाचा विचार आधीच केला आहे. जर १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घ्यायचा आहे, तर दर आठवड्याला एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे दहाच नव्हे, तर १४ टक्के पाणीबचत होईल. मात्र, यावर येत्या चार दिवसांत अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.





