Water Cut: तूर्त पाणीकपात नाही, पुढील आठवड्यात निर्णय
Water Cut:

Water Cut: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या समाधानकारक पाणीसाठा असल्याने पुणेकरांना आणखी काही दिवस नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुढील आठवड्यातील सर्वपक्षीय बैठकीत होणार आहे. तोपर्यंत पुणेकरांना दररोज नियमित पाणी दिले जाणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शनिवारी स्पष्ट केले.
पालखी सोहळ्यानिमित्त पालिकेने ७ ते १२ जुलैदरम्यान पाणीकपात स्थगित केली होती. ही मुदत रविवारी (१२ जुलै) संपत आहे. सोमवार पासून पुन्हा पाणीकपात होणार का याबाबत पुणेकरांमध्ये संभ्रम होता. खडकवासला धरण साखळीत सध्या १६.६४ टीएमसी पाणीसाठा आहे.
काही दिवसांपूर्वीच्या मुसळधार पावसामुळे धरणांतील साठ्यात मोठी वाढ झाली आहे. कपातीबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले की, पाणीकपातीचा निर्णय होईपर्यंत शहरातील नियमित पाणीपुरवठाच कायम राहील. याबाबत सर्व संबंधित अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांना जुन्या वेळापत्रकानुसार पाणीकपात लागू करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. याबाबत पुढील आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. त्याचवेळी पाणीकपातीचा अंतिम निर्णय होईल. तोपर्यंत शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू राहील.- मंजूषा नागपुरे, महापौर





