पिंपरी | मावळमध्ये वन्य प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी

सोमाटणे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील चौराई डोंगर, तळेगाव खिंड ते बऊर खिंडीपर्यंतच्या जंगलातील वन्यजीवांसाठी वनविभागाने पाणवठ्यांवर पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
चौराई डोंगर, तळेगाव खिंड ते बऊर खिंडीपर्यंतचे घनदाट जंगल हे वन विभागाच्या अख्यत्यारित येते. या जंगलात भेकर, ससा, रानडुक्कर, मोर, साप आदींसह विविध जातींचे पक्षी व प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. दरवर्षी साधारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस डोंगरदऱ्यात असलेल्या झऱ्यातील पाणी आटते.
त्यामुळे, वन्यप्राण्यांना पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत होते. प्रसंगी पाण्यासाठी द्रुतगती मार्ग किंवा जुना पुणे-मुंबई महामार्ग ओलांडून पवना, इंद्रायणी नदी किंवा तळेगावच्या ऐतिहासिक तळ्यावर जावे लागत होते. त्यामध्ये, अनेक प्राण्यांना रस्ता ओलांडताना जीव गमवावा लागत होता.
ही समस्या सोडवण्यासाठी वन विभागाने दोन वर्षांपूर्वी शंकरवाडी नंबर दोन जवळ पाण्यासाठी दोन पाणवठे व पाणी साठवण टाकी बांधली. या पाणवठ्यातील पाण्याचा वापर वन्यप्राणी एप्रिल महिन्यानंतर करत असत. परंतु, यावर्षी हवामान बदलामुळे पावसाने लवकर उघडीप दिल्याने कडक उन्हाळ्याची सुरुवातही मार्च महिन्यात लवकर झाली. कडक उन्हामुळे सध्या डोंगर दऱ्यातील पाणी मार्च महिन्यातच पूर्ण आटले.
चौराईदेवीजवळील सोमाटणे ग्रामस्थांनी पाण्याची साठवण टाकी बांधली असून शंकरवाडीजवळ वन विभागाचा पाणवठा आहे. शंकरवाडीजवळील पाणवठ्यावर पाणी नसल्याने वन्यप्राण्यांची गैरसोय होत होती. मात्र, अखेर तेथे वनविभागाने टँकरद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.





