water : पाणी उकळूनच पिण्याचे आवाहन
water :

water : शहराच्या बहुतांश भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळूनच वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणाऱ्या कच्च्या पाण्याच्या गढूळपणात मोठी वाढ झाली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून वितरित होणाऱ्या पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
पिण्याच्या पाण्यात कोणतेही रोगजन्य जीवाणू राहू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी पाणीपुरवठा विभागाकडून घेतली जात आहे, असे महापालिकाही प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, सिंहगड रस्त्यालगतच्या हद्दवाढीतील गावांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्यावर केवळ निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्या भागातील नागरिकांनी पाणी गाळून, उकळूनच वापरावे, असेही महापालिकेने नमूद केले आहे.





