पुणे जिल्ह्यातील मोठ्या आर्थिक व्यवहारांवरही ‘वाॅच’

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यातील बड्या आर्थिक व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. या निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्षांच्या करडी नजर ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च सनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहित नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत पैशांचा गैरवापर प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुका होणे आवश्यक आहे. त्यात बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. ज्या खात्यातून अनेक दिवसांपासून कोणतेही व्यवहार होत नसतील आणि आता अचानक त्या खात्यातून व्यवहार होत असतील, तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
उमेदवाराचे एक खाते असताना निवडणूक प्रक्रियेसाठी दुसरे खाते उघडायचे असल्यास त्यांना सहकार्य करावे. बँकेच्या एखाद्या शाखेत पैशांची मागणी अचानक वाढली आहे का? याबाबतही बँकांनी माहिती संकलित करावी. तसेच इतर दैनंदिन व्यवहारांवर देखील लक्ष ठेवावे. काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विविध यंत्रणा कार्यरत
विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक करसह अन्य यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनने दिली आहे.





