गटार तुंबल्याने सांडपाणी घरांत

पिंपळे गुरव – दापोडी येथील कुलकर्णी चाळ व अत्तार वीटभट्टी परिसरात दीड वर्षांपासून सातत्याने गटार तुंबत असल्याने सांडपाणी नागरिकांच्या घरादारांत शिरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गटार तुंबल्याने सांडपाणी परिसरात सर्वत्र पसरल्याने नागरिकांना रस्त्याने ये-जा करणे कठीण होत आहे. लहान मुले या पाण्यात खेळतात त्यामुळे त्यांना संसर्ग होऊन आजारी पडत आहेत. काहींना त्वचेचे आजार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी येते. त्यामुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे.
उघड्यावर सांडपाणी पसरल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दाखल करूनही महापालिका प्रशासन गटारांची साफसफाई करीत नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी नालेसफाई होत नाही, त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची महापालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नालेसफाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
वाहन चालकांना करावी लागतेय कसरत
वाहनचालकांना या रस्त्याने वाहन चालविताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यातच पाणी असल्याने गाडी चालवताना आजूबाजूला कोणी नाही ना त्यांच्या अंगावर पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, शाळेतील विद्यार्थी रस्त्याने जात असताना अचानक एखाद्या वाहनचे पाणी अंगावर आले तर सर्व कपडे खराब होतात, काही वेळेस येथे वाद पण होताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रस्त्याने वाट काढताना जीव मेटाकुटीला येत आहे. त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आम्ही परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. लवकरात लवकर नालेसफाईचे करून घेण्यात येईल. त्यासंबंधी महापालिकेच्या आरोग्य विभाग व स्थापत्य विभागास कळविले आहे.
– स्वाती काटे, नगरसेविका
दीड वर्षांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत तरीदेखील याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. आम्ही महापालिका आयुक्तांना त्यासंबंधी निवेदनदेखील दिले आहे. तसेच वारंवार तक्रारी करूनही नालेसफाई झाली नाही. त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे.
– उषा भोसले, रहिवासी





