बावधनसह परिसराचा कचरा प्रश्न पेटणार

पुणे- बावधन येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याला भूगाव आणि भुकूम येथील ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध दर्शवला आहे. याबाबत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत कायदेशीर आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या पत्रकार परिषदेला किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन अभियानाचे समन्वयक वीरेंद्र चित्राव, भुकूमच्या सरपंच सुवर्णा आंग्रे, भूगावच्या सरपंच निकिता सणस, माजी उपसरपंच अक्षय सातपुते, ग्राम पंचायत सदस्य गौरी भातवंशी, माजी सैनिक अनिल चोंधे, पर्यावरण कार्यकर्ता किशोर मोहोळकर, जीवित नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे, अनिल गायकवाड, विनोद बोधनकर यांच्यासह परिसरातील नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी निकिता सणस म्हणाल्या, “भूगाव हे मुळशीचे प्रवेशद्वार असून, तेथेच कचरा संकलन प्रकल्प उभारल्यास बिकट परिस्थिती ओढावेल. केवळ दुर्गंधीच वाढणार नसून संपूर्ण तालुक्याचे हवा-पाणी प्रदूषित होऊन आरोग्य धोक्यात येणार आहे. राम नदीची मालकी सिंचन विभागाअंतर्गत येत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, पत्र व्यवहार करून हा अनैसर्गिक आणि अव्यवहारिक प्रकल्प त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. परंतु, त्याविषयी आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.’
यावेळी सुवर्णा आंग्रे म्हणाल्या, “निसर्गाच्या कुशीत घर असावे, हे स्वप्न उराशी बाळगून अनेकांनी येथे लाखो-करोडो रुपये गुंतवून घरे घेतली असून पुणे मनपाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हट्ट आणि दुराग्रहामुळे हा प्रकल्प येथे अस्तित्वात येऊ घातला आहे. यामुळे राम नदीच्या आरोग्यासह त्या भागातील नैसर्गिक जलस्रोत आणि झरे नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत.’





