Impact Player Rule ने ‘या’ खेळाडूची कारकीर्द आणली धोक्यात, ५९% सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाले नाही स्थान

Washington Sundar IPL career ruined due to BCCI Impact player rule : आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा नियम सुरू झाल्यापासून, संघांचे नशीब बदलले आहे. प्रत्येक संघ ११ ऐवजी १२ खेळाडूंसह मैदानावर खेळत आहे. बीसीसीआयच्या या नियमामुळे अनेक मोठे विक्रमही मोडले जात आहेत. परंतु या नियमामुळे अनेक खेळाडूंना नुकसान सहन करावे लागत आहे, ज्यामध्ये अष्टपैलू खेळाडूंची संख्या सर्वाधिक आहे.
इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा अष्टपैलू खेळाडूला मोठा फटका –
खरं तर, इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे संघ १२ वा खेळाडू म्हणून विशेषज्ञ फलंदाज किंवा गोलंदाज निवडतात, ज्यामुळे अष्टपैलू खेळाडू मागे राहतात. बीसीसीआयच्या या नियमामुळे भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची कारकीर्दही उद्ध्वस्त होत चालली आहे. २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या या उजव्या हाताच्या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ६० सामने खेळले आहेत. स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू झाल्यापासून, त्याला २२ पैकी फक्त ९ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
वॉशिंग्टन सुंदर ५९ टक्के सामन्यात बेंचवर –
त्यामुळे ५९ टक्के सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसायला लागले आहे. आयपीएल २०२३ मध्ये सुंदरला ७ सामने खेळण्याची संधी मिळाली आणि गेल्या २०२४ च्या हंगामात त्याला फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली. वॉशिंग्टन सुंदर आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात जेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, तेव्हा चाहते खूप आश्चर्यचकित झाले.
वॉशिंग्टन सुंदरबद्दलचे चाहत्याची पोस्ट व्हायरल –
यानंतर पुष्कर नावाच्या एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली, जी खूपच व्हायरल होत आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले, ‘सुंदर भारतातील सर्वोत्तम १५ संघांमध्ये त्याला स्थान कसे मिळते, पण १० संघ असूनही त्याला कोणत्याही आयपीएल इलेव्हनमध्ये स्थान कसे मिळत नाही हे एक गूढ आहे.’
I have been wondering this too:)
— Sundar Pichai (@sundarpichai) March 25, 2025
पुष्करच्या या प्रश्नाचे उत्तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिले. ते म्हणाले,”मीही तोच विचार करत होतो,” यासह त्यांनी एक स्मायली इमोजी शेअर केला आहे.





