मोठी बातमी..! अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा होता? पोलिसांची कोर्टात धक्कादायक माहिती

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झालेल्या कथित दगडफेक हल्ल्याच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘बी फायनल’ (क्लोजर) रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. फॉरेन्सिक तपास आणि पुराव्यांच्या अभावी ही घटना ‘फर्जी’ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, या रिपोर्टमुळे राज्यातील राजकीय वातावरणात एकाच खळबळ उडाली आहे.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अंतिम दिवशी (१९ नोव्हेंबर) अनिल देशमुख हे मुलगा सलिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील प्रचारासाठी नरखेडला गेले होते. काटोलकडे परतताना बैलफाटा येथे रात्री सुमारे ८ वाजता अंधारात लपलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर दगडफेक केली, असा आरोप करण्यात आला होता. दगडफेकीत कारचे शीशे फुटले आणि देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना प्रथम काटोल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून नंतर नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
ही घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काटोल आणि नागपूरमध्ये रात्रीभर आंदोलने केली. सलिल देशमुख यांनी भाजपवर हल्ल्याची जबाबदारी टाकली आणि ‘भाजपला पराभवाची भीती वाटतेय’ असा आरोप केला. सुप्रिया सुळे यांनीही हिंसेसाठी भाजपला दोषी ठरवले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजिनिकांत चित्रपटाच्या संदर्भात हल्ल्यावर शंका उपस्थित केली.
फॉरेन्सिक तपासात ‘काही तथ्य नाही
दरम्यान, नागपूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला. फॉरेन्सिक सायन्स लॅब (RFSL) टीमने घटनास्थळाची तपासणी केली, दगड, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे गोळा केले. मात्र, तपासात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. सीसीटीव्हीमध्ये दुचाकी किंवा हल्लेखोरांचे चित्रण नव्हते, आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांचा फॉरेन्सिक तपासात ‘काही तथ्य नाही’ असा निष्कर्ष निघाला. यानुसार, पोलिसांनी न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट दाखल केला आहे, यामुळे प्रकरण बंद होण्याची शक्यता आहे.





