“रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, याची चौकशी करा”; अनिल परबांचा घणाघात

Anil Parab | शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चढवला. रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, याची चौकशी करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल परब ?
मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले की, “1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने ज्योती कदम यांनी स्वत:ला जाळून घेतले. मात्र, तिने स्वत:ला जाळून घेतले होते की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिहे. रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी.”
“२०१४ ते २०१९ रामदास कदम मंत्री होते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग मंत्रिपद का घेतले? तुम्ही त्याच वेळी अशा माणसासोबत मी काम करणार नाही असं सांगायला हवे होते. रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणा केला. याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटतं नव्हती. पोरी बाळी नाचवणाऱ्याला उत्तर द्यावं वाटतं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो. त्यामुळं ही जबाबदारी माझ्याकडे होती. 24 तास मी तिथे होतो. त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो,” असेही अनिल परब म्हणाले.
14-15 वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला?
“आता 14-15 वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलं. मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार आहे ती त्यावेळी का केली नाही. गेली 12 वर्षे का तोंड बंद होतं? रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा 100 टक्के खोटा आहे. कुठलाही मृतदेह दोन दिवस शेवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का? कुठली इंजेक्शन दिली, काही जरी केले तरी हे शक्य नाही,” असे म्हणत अनिल परब यांनी रामदास कदम यांचा दावा खोडून काढला.
अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीत होते, त्यावेळी २४ तास तिथे डॉक्टरांचे पथक होते.तिथे असंख्य लोक भेटायला येत होते. महाराष्ट्रातील प्रश्न बाजूला नेण्यासाठी असे आरोप करून कुटिल डाव आहे. रामदास कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. अब्रू नुकसानीच्या दाव्यातून मिळणारी रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितले.
अधिवेशनात पुराव्यासकट प्रकरण मांडणार
“रामदास कदम यांचे अनेक अपराध झालेले आहेत, ज्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे, मुख्यमंत्री का वाचवत आहेत? अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवत आहात. एवढे अपराध, डान्सबार चालवतात, वाळूचोर आहेत, दादागिरी करताय, जमिनी लाटतायंत, माझ्याकडे सगळी प्रकरणे आली आहेत. या अधिवेशनात पुराव्यासकट मी प्रकरण मांडणार, मुख्यमंत्री किती वेळा या लोकांना वाचवणार. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे, पण ही आत्महत्या का केली? याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे, त्याचे देखील कारण बाहेर आलं पाहिजे,” असे देखील यावेळी परब म्हणाले. Anil Parab |
हेही वाचा:
प्रवरा अर्बनच्या चेअरमनपदी डॉ. करणसिंह घुले तर व्हाईस चेअरमनपदी सतिष गायके यांची बिनविरोध निवड





