“करेक्शन’बाबत अगोदरच इशारा दिला होता; सेबीच्या अध्यक्ष मधाबी पुरी बुच यांचे स्पष्टीकरण

मुंबई – शेअर बाजारावर नोंदलेल्या मिड कॅप व स्मॉल कॅप मधील कंपन्यांच्या शेअरचे भाव अपेक्षेपेक्षा जास्त पातळीवर आहेत असे आपण गेल्या वर्षी सुचविले होते. त्याची आठवण शेअर बाजार नियंत्रक सेबीच्या अध्यक्षा मधाबी पुरी बुच यांनी आज करून दिली. आता मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यामुळे पुन्हा नव्याने या विषयावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता शेअर बाजार नियंत्रकांना वाटत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये एकूणच निर्देशांक वेगाने वाढत होते. त्यातल्या त्यात छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त वाढत होते. ही वाढ निरोगी नसल्याचे त्यावेळी आपण स्पष्ट केले होते, असे बुच यांनी सांगितले. प्रत्यक्षात बाजार नियंत्रक अशा प्रकारच्या घटनाक्रमावर वक्तव्य करत नसतानाही आपण परिस्थितीपूर्व खबरदारीची उपाययोजना म्हणून तसे वक्तव्य केले होते, असे बुच यांनी सांगितले.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यातल्या त्यात स्मॉल कॅप आणि मिडकॅप मधील कंपन्यांची सर्वात जास्त प्रमाणात हानी होत आहे. म्युच्युअल फंड नियंत्रकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बुच यांनी सांगितले की जेव्हा गरज होती त्यावेळी आपण योग्य प्रकारचा इशारा जारी केला होता.
20 टक्क्याचे करेक्शन –
ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजाराच्या मुख्य निर्देशांकात जवळजवळ दहा टक्क्याचे करेक्शन झाले आहे असे असतानाच स्मॉल कॅप आणि मिडकॅपचे मात्र 20% पेक्षा जास्त करेक्शन झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करणार्या किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यावर सेबीचे भाष्य अपेक्षित असतानाच बुच यांनी आपण अगोदरच या संदर्भात इशारा दिला होता असे स्पष्ट केले आहे.
काही क्षेत्रात बुडबुडे –
सध्या शेअर बाजारात काही क्षेत्रातील निर्देशांक आणि काही कंपन्यांचे शेअर आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याचे बोलले जाते. काही जण याला बुडबुडे म्हणतात. तर काहीजण फेस म्हणतात. अशा प्रकारची परिस्थिती दीर्घकाळ निर्माण होऊ नये, यासाठी संबंधितानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी स्वतः अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास जास्त नफ्यासाठी गुंतवणूक टाळण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तशा एसआयपीचे बंधन नाही –
दरम्यान बुच यांनी कमी किमतीच्या एसआयपी उपलब्ध करण्याची गरज काही महिन्यापूर्वी व्यक्त केली होती. आता स्टेट बँकेच्या म्युच्युअल फंडाने अडीचशे रुपयांच्या एसआयपीची योजना जाहीर केली. अशा प्रकारची योजना सर्वच म्युच्युअल फंडांनी जाहीर करावी यासंदर्भात काही बंधन घातली जाणार आहे का असे विचारले असता, बुच यांनी असे सांगितले की, तशा प्रकारचा कसलाही प्रस्ताव विचाराधीन नाही.




