राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुढील 5 दिवस महत्वाचे

मुंबई : पुढील पाच दिवस म्हणजे 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. सोबत चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत राज्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापैकी मराठवाड्यात 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे.
विदर्भातील काही भागात २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागात २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर अधिक असणार आहे.
मराठवाड्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १२४ टक्के पाऊस पडला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी६०४ मिमी पाऊस होत असतो. मात्र आता ७४७ मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा १६५ टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.
धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळले. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेने पाणी पोहोचवावे लागले होते, तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचे रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे.





