पुणे – आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाल परीच्या माध्यमातून पावणे दहा भाविकांनी पंढरी गाठून विठ्ठल दर्शन घेतले. त्यासाठी एसटीने सात दिवसांत पाच हजारांहून अधिक जादा एसटी मार्गस्थ केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजारांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास सात कोटीने उत्पन्नात वाढले. ज्यांना पालखी सोहळ्याबरोबर चालत जाता येत नाही ते वारकरी आषाढीच्या दोन दिवस आधीच पंढरपूरात येतात. लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असेत. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांसाठी एसटी ने यंदा ५ हजार २०० जादा बसेचे नियोजन केले होते. ३ ते १० जुलै दरम्यान तब्बल २१ हजार ४९९ बसफेऱ्यांच्या माध्यमातून ९ लाख ७१ हजार ६८३ भाविकांनी प्रवासाचा लाभ घेतला. पुणे विभागाला दोन कोटी पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगरसह जिल्ह्यातील सर्व आगारांमधून पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या. आठ दिवसाच्या सेवेत पुणे एसटीला २ कोटी १६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तेच गतवर्षी १ कोटी ९० लाख इतके होते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा २६ लाखांनी उत्पन्नात वाढ झाल्याचे पुणे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.