प्रभात वृत्तसेवा रांजणी – गेल्या काही दिवसापासून आंबेगाव तालुक्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अर्थात थंडीची तीव्रता वाढू लागली की अनेकांना रक्तदाब वाढण्याचा त्रास जाणवू लागतो. तापमान घसरल्याने रक्तवाहिन्या आंकुचन पावतात आणि त्यामुळे रक्तप्रवाहावर अतिरिक्त दाब येतो. विशेषतः ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी ही स्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. योग्य काळजी न घेतल्यास हृदय – विकारासह विविध गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.थंडीच्या दिवसात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधोपचाराचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मंचर येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.हर्षद शेटे यांनी सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना थंडीच्या दिवसांमध्ये अधिक त्रास जाणवू शकतो. यासाठी त्यांनी थंडीपासून बचाव करण्याकरता उबदार कपडे घालून औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे.तापमानात होत असलेल्या अचानक चढउताराचा थेट परिणाम रक्त दाबावर जाणवतो. आंबेगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाची तक्रार आहे. त्यांच्यासाठी थंडीचा काळ अधिक जखमीचा ठरतो. रक्तदाब अचानक वाढल्याने हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. अर्थात गरम पाणी पिऊन शरीर उबदार ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित व्यायाम व हलके चालणे, मिठाचे प्रमाण कमी करणे आणि औषधे वेळेवर घेणे गरजेचे आहे. संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला रांजणी (ता.आंबेगांव) येथील डॉ. संजय घाडगे यांनी दिला आहे. तीव्र थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालावेत. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक असून नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉ. संजय घाडगे यांनी सांगितले.थंडीसोबत वाढणारा गारठा शरीरातील रक्तवाहिन्यांना आकुंचन पावण्यास भाग पाडतो. त्यामुळे रक्त प्रवाहावर अतिरिक्त दाब येतो आणि ही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया रक्तदाब वाढण्यासाठी ठरते. खंडित रक्तवाहिन्या अरुंद होतात, हृदयाला रक्तपुरवठ्यासाठी अधिक ताकद लागू लागते आणि रक्तदाब वाढतो. तसेच शरीर उष्णता टिकवण्यासाठी नैसर्गिक तंत्रज्ञान वापरते. ज्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी धोका वाढतो. थंडीत बाहेर पडणे टाळावे सध्याच्या वाढत्या थंडीमुळे हृदय आणि मेंदूपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे हृदयविकार, अंगदुखी थकवा यासारखे आजार बळवण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. थंडीमुळे हात पायाची बोटे, कान आणि नाक यासारखे शरीराचे टोकाचे भाग गारठतात आणि कडक होतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचे लक्षण दिसू शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. थंडीमध्ये रक्त दाबावर सतत लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हाय बीपी असलेल्या रुग्णांनी उबदार राहणे, औषधांचा नियमित वापर करणे आणि थंडीत बाहेर पडणे टाळावे. तसेच त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन हृदयरोगतज्ञ डॉ.हर्षद शेटे यांनी केले आहे.