wari :पालखी सोहळ्यातील दिंड्यांना यंदाही अनुदान
wari :

२.८० कोटींचे थेट खात्यात वितरण सुरू, मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचा निर्णय
१,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये
शासकीय नोंदी असणाऱ्या दिंड्यांना प्राधान्य
wari : मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षांपासून मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे अनुदान या वर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले असून, विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू करण्यात आले आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारी सन २०२६ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दि. २ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या वर्षी वारीकरिता येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयेप्रमाणे एकूण २ कोटी ८० लाख रुपये इतके वित्तीय अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
ज्या दिंड्यांचे बँक तपशील अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशा दिंडी प्रमुखांनी आपले बँक खाते आणि आवश्यक तपशील संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे किंवा विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे त्वरित सादर करावेत, जेणेकरून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात विनाविलंब जमा करता येईल,असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले आहे.
चालू वर्षामध्ये एकूण १ हजार ४०० दिंड्यांना हे अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. सद्यःस्थितीत एकूण १ हजार १९९ पात्र दिंड्यांपैकी १ हजार दिंड्यांचे बँक तपशील प्राप्त झाले असून त्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
उर्वरित १९९ दिंड्यांच्या बँक खात्यांचे तपशील प्राप्त होताच तत्काळ निधी वर्ग करण्यात येईल. तसेच, वारीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ४१ नवीन दिंड्यांच्या बाबतीतही आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





