वारीमुळे सकारात्मक वातावरण निर्मिती – डॉ. नितीन करमळकर

विद्यापीठाच्या “व्हर्च्युअल वारी’चा प्रारंभ
पुणे(प्रतिनिधी) – विद्यापीठाच्या ऑनलाईन वारीमुळे एक सकारात्मक वातावरण निर्मिती तयार होऊन करोनामुळे संभ्रमावस्थेत असणारे विद्यार्थी त्यातून बाहेर येतील. या निराशेमधून बाहेर पडून विद्यार्थी व इतर समाज पुन्हा नव्या उत्साहाने काम करण्यास तयार होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फे आयोजित ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’चे ऑनलाईन उदघाटन विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. पराग काळकर, डॉ. मनोहर चासकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते.
प्रारंभी पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्र विभागाच्या गुरुकुल शाखेतील विद्यार्थ्यांनी भक्तिरंग हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे डॉ. संतोष परचुरे आणि डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्वागत केले.
राजेश पांडे म्हणाले, “करोनाच्या काळात पुणे विद्यापीठाने समाजबद्दलची संवेदनशीलता आपल्या कृतीमधून दाखविली आहे. व्हर्च्युअल वारीच्या माध्यमातून आमचे कोरोना वॉरियर्स समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहेत.’ तर डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, एनएसएसचा प्रत्येक विद्यार्थी ऊर्जेचा एक अखंड स्रोत असतो, असे म्हणाले. सूत्रसंचलन स्वामीराज भिसे यांनी केले.





