चीनबरोबर युध्द आवश्यकच; भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनींच मांडली पंतप्रधानांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका

नवी दिल्ली – भारताने रशिया आणि युक्रेनच्या युध्दाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. तसेच सध्याचे युग हे युध्दाचे युग नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका मांडली आहे. चीनसोबत युध्द आवश्यकच असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.
भारताने रशिया-युक्रेन युध्दाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेचा आधार घेत स्वामी म्हणाले की, प्रत्येक समस्येचा तोडगा काढण्यासाठी या भूमिकेचा सिध्दांत म्हणून उपयोग केला जाऊ शकत नाही. 1996 मध्ये करार होऊनही चीनने 2000 मध्ये नियंत्रण रेषा ओलांडली होती आणि लडाखवर कब्जा केला होता. ही आक्रमकता आहे आणि त्यावर युध्द हाच तोडगा आहे.
ते पुढे म्हणाले की, चीनच्या विषयावर स्वामी यांच्याकडून अशी जाहीर प्रतिक्रिया दिली जाण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला आहे. चीनच्या मुद्द्यावर शांत राहणे हा तोडगा नसून आपल्याला युध्दाच्या माध्यमातूनच त्यावर तोडगा काढला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.





