War Updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणसाठी आता वेळ संपत आली असून केवळ ४८ तास शिल्लक आहेत. या काळात इराणने तडजोड करावी किंवा ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) खुली करावी, अन्यथा मोठ्या विनाशाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी त्यांनी दिली आहे. काय आहे ट्रम्प यांची पोस्ट? ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी इराणला १० दिवसांचा वेळ दिला होता, हे आठवतेय का? आता वेळ संपत चालली आहे आणि फक्त ४८ तास उरले आहेत. यानंतर केवळ विनाशच पाहायला मिळेल. देवाचा विजय असो!” यापूर्वी ट्रम्प यांनी ही डेडलाईन १० दिवसांनी वाढवून ६ एप्रिलपर्यंत केली होती, ज्यामुळे चर्चेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी इराणवर दबाव वाढवला आहे. सध्या जगातील तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुजचा मार्ग बंद आहे. हेही वाचा – अमित शहांच्या रोड शोमध्ये राडा; 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आणि अमेरिकेची धरसोड वृत्ती – २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इस्रायलच्या सोबतीने इराणविरुद्ध ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरू केले होते. सुरुवातीला इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करणे, नौदलाला कमकुवत करणे आणि त्यांना अण्वस्त्र बनवण्यापासून रोखणे ही मुख्य उद्दिष्टे होती. मात्र, गेल्या महिनाभरात अमेरिकेच्या भूमिकेत वारंवार बदल होताना दिसत आहेत. कधी ट्रम्प म्हणतात की या युद्धाचा तेलाशी संबंध नाही, तर कधी म्हणतात की तेल घ्या आणि नफा कमवा. कधी ते युद्ध संपत आल्याचा दावा करतात, तर कधी इराणच्या पायाभूत सुविधांवर अधिक तीव्र हल्ल्यांच्या धमक्या देतात. होर्मुजच्या मुद्द्यावरही त्यांनी आधी सांगितले होते की इतर देश हा मार्ग उघडू शकतात, पण आता वॉशिंग्टन स्वतः हे प्रकरण हाताळेल असे ते म्हणत आहेत. शांतता चर्चेसाठी पाकिस्तानशी संपर्क – दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अरागची यांनी शनिवारी सांगितले की, तेहरानने इस्लामाबादमधील शांतता चर्चेला कधीही नकार दिलेला नाही. पाकिस्तानच्या मध्यस्थीचे त्यांनी कौतुक केले. अरागची यांच्या मते, चर्चेचा हेतू या ‘बेकायदेशीर युद्धा’वर कायमस्वरूपी आणि अंतिम तोडगा काढणे हा असावा. पाकिस्तानचे स्पष्टीकरण: पाकिस्ताननेही चर्चा थांबल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी सांगितले की, “मीडियामधील अफवांवर विश्वास ठेवू नका. इराण नेतृत्व पाकिस्तानच्या संपर्कात असून ते चर्चेसाठी तयार आहेत.” मात्र, इराणकडून ठोस संकेत मिळत नसल्याने चर्चेची गती मंदावली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, होर्मुजची सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक स्तरावर तेलाचा मोठा तुटवडा निर्माण होऊन युद्धाचा धोका अधिक गडद होण्याची शक्यता आहे. आता साऱ्या जगाचे लक्ष ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमकडे लागले आहे.