West Bengal Election: अमित शहांच्या रोड शोमध्ये राडा; 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या या धडक कारवाईमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

West Bengal Election: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या गोंधळाची निवडणूक आयोगाने (ECI) गंभीर दखल घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवत आयोगाने कोलकात्याच्या ४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकी घटना काय?
दोन दिवसांपूर्वी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवत असून, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमित शहा स्वतः उपस्थित होते.
हा रोड शो जेव्हा ममता बॅनर्जी यांच्या घरासमोरून जात होता, तेव्हा तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ‘सुवेंदू अधिकारी चोर है’ अशा घोषणा दिल्या. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की, अमित शहा यांना आपले वाहन सोडून दुसऱ्या मार्गाने निघून जावे लागले.
आयोगाचा ठपका आणि कारवाई –
अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री असल्याने त्यांचा दौरा हाय-सिक्युरिटी झोनमध्ये येतो. मात्र, इतका मोठा गोंधळ होऊनही पोलिसांनी पुरेशी खबरदारी घेतली नाही, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे.
कारवाई झालेले अधिकारी –
कोलकाताचे पोलिस उपायुक्त सिद्धार्थ दत्ता, प्रभारी अधिकारी प्रियांक चक्रवर्ती, अतिरिक्त प्रभारी चंडीचरण बॅनर्जी, सौरभ चॅटर्जी अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
उद्या सकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश –
निवडणूक आयोगाचे सचिव सुजित कुमार मिश्रा यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत. ३ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या पत्राच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. “या ४ अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करून ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत त्याचा अहवाल सादर करावा,” असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच, या रिक्त झालेल्या जागांवर तातडीने नवीन नेमणुका करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या धडक कारवाईमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.





