पपुल्या गॅंगचा धुमाकूळ, 36 वाहनांची तोडफोड; तीन नागरिकांवर कोयत्याने हल्ला

पुणे – वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील “वॉण्टेड’ गुन्हेगार पपुल्या वाघमारे (वय 19) याच्या टोळीने मंगळवारी रात्रभर शहरात धुमाकूळ घातला. त्याच्या टोळीने प्रथम कर्वेनगर परिसरात मध्यरात्री दहा वाहनांची तोडफोड करत तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यानंतर हे टोळके पहाटे सहकारनगर येथील तळजाई वसाहतीत दाखल झाले. तेथे त्यांनी तब्बल 26 वाहनांची तोडफाड करत दहशत माजवली. त्यांना रोखायला आलेल्या नागरिकांवर कोयते उगारत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिसांनी आज दुपारी पपुल्यासह सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. पपुल्याच्या कारनाम्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, त्याचा मागील एका प्रकरणातील मोक्क्याचा प्रस्ताव आज तातडीने मंजूर करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पपुल्या वाघमारे हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
रामनगर परिसरात तो राहत असून, तेथे त्याची मोठी दहशत आहे. दोन महिन्याभरापूर्वी त्याच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून तो “वॉण्टेड’ होता. वारजे पोलिसांनी पपुल्यासह त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे.
कोम्बिंग ऑपरेशनवेळीच तोडफोड
वारजे माळवाडी परिसरात परवा सात वाहनांची तोडफोड झाली होती तसेच तीन दिवसांपूर्वी एका तरुणावर गोळीबार झाला होता. या पार्श्वभूमीवर रामनगर झोपडपट्टी परिसरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी मंगळवारी रात्री कोमिंग ऑपरेशन राविण्यात आले होते. रामनगर परिसरात हे ऑपरेशन सरू असतानाच पपुल्या टोळीने कर्वेनगर परिसरात दहशत माजवली. त्यांनी तीन दुचाकी आणि सात चारचाकींची तोडफोड केली.
त्यांना प्रतिकार करण्यासाठी आलेल्या तिघा नागरिकांवर त्यांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही खबर मिळताच कोम्बिंग ऑपरेशन करणारी पथके कर्वेनगर परिसरात दाखल झाली. मात्र त्याअगोदरच पपुल्या टोळीने दुचाकीवरुन पळ काढला.
ही टोळी पहाटे सव्वातीनच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळजाई वसाहत परिसरात दाखल झाली. तेथील नागरिक साखर झोपेत असतानाच टोळीने परिसरातील वाहनांची तोडफोड सुरु केली. त्यांनी रस्त्त्यावर लावलेली तब्बल 26 वाहने कोयत्याने फोडली. तोडफोडीच्या आवाजामुळे काही नागरिक झोपेतून उठून घराबाहेर आले.
त्यांनी दगड आणि कुंड्या फेकून मारत प्रतिकाराचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर कोयते घेऊन त्यांच्या दिशेने धावले. यामुळे नागरिक घरात पळाले. यानंतर काही नागरिकांनी पोलिसांना फोन करुन खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच टोळी पसार झाली.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न,दंगल, आर्म ऍक्ट आणि दहशत पसरवण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर सहकारनगर पोलीस ठाण्यात दहशत पसरवणे, आर्म ऍक्ट आदी कलमाअंतर्गत पपुल्या वाघमारेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर आणि गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले होते.
टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
वारजे माळवाडी आणि तळजाई वसाहत येथे वाहनांची तोडफोड करणाऱ्या पपुल्या वाघमारेसह त्याच्या पाच साथीदारांना मंगळवारी मोक्का लावण्यात आला. त्याच्यावर वारजे माळवाडी आणि अलंकार पोलीस ठाण्यात दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यात त्याच्या टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. त्यांना मोक्का लावताना प्रस्तावात ते मागील दहा वर्षांपासून गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा उल्लेख आहे. पपुल्या उर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे(19,रा.रामनगर, वारजे माळवाडी), राहुल विठ्ठल वांजळे (24,रा.अहिरेगाव), मारत्या पांडुरंग टोकलवार ( 19,रा.वारजे), बाबा संतोष वांजवडे(19,रा.वारजे) आणि त्यांच्या वॉंटेड नंद्या नावाच्या साथीदाराचा समावेश आहे.
या गुन्ह्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगाही आहे. मोक्काच्या प्रस्तावात पपुल्याने संघटित टोळी तयार केली असून त्यांनी मागील दहा वर्षात खुनाचा प्रयत्न, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत पसरवणे, असे गुन्हे केल्याचे म्हटले आहे. तसेच टोळी प्रमुख पपुल्या वाघमारे व त्याच्या टोळीविरुद्ध मागील दहा वर्षाच्या कालावधीत एकापेक्षा अधिक दोषारोपपत्र सक्षम न्यायालयापुढे दाखल केली असल्याचे म्हटले आहे. अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांनी ही मान्यता दिली आहे. त्यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पपुल्याच्या टोळीला मोक्का लावण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले होते. दुपारनंतर मोक्का प्रस्ताव मान्य झाला.
पपुल्या टोळीच्या कृत्याची आम्ही गंभीर दखल घेतली असून, टोळीला मोक्का आणि एमपीडीए लावण्याच्या हालचाली जलद करण्यात येत आहेत. या प्रकारची गुंडगिरी कधीच आणि कोणत्याच गुंड टोळीकडून खपवून घेतली जाणार नाही, असे अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील म्हणाले.





