वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार?

Waqf Amendment Bill | वक्फ दुरुस्ती विधेयक आज 2 एप्रिल रोजी बुधवारी लोकसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार आहे. या विधेयकावरून सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडीमध्ये जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. विधेयक मांडण्यापूर्वीच दोन्ही गटांनी आपल्या खासदारांना व्हिप जारी करत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.
याशिवाय विरोधकांनी चर्चेची वेळ वाढवून 12 तास करण्याची मागणी केली आहे. यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील कार्य मंत्रणा समितीने विधेयकावर आठ तास चर्चेची तयारी केली आहे, जी गरजेनुसार वाढवली जाऊ शकते, असे सांगितले आहे.
टीडीपी आणि जेडीयूचा पाठिंबा
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. मात्र वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात आहे.
ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत विरोधात राहणार ?
ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका चर्चेवेळी उघड होण्याची शक्यता आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत विरोधात राहणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील काही मुद्द्यांवर जेपीसीमध्ये बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व लोकसभा खासदारांनी आज लोकसभेत हजर राहून चर्चेत सहभागी व्हावे, अशा प्रकारचा व्हीप पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. Waqf Amendment Bill |
कॅबिनेटने फेब्रुवारीमध्ये या विधेयकाला मंजुरी दिली
मंत्रिमंडळाने 19 फेब्रुवारी रोजी वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली होती. विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालाच्या आधारे वक्फ विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. या विधेयकावरील जेपीसी अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 13 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आला.
समितीने 30 जानेवारी रोजी सभापती ओम बिर्ला यांना 655 पानांचा अहवाल सादर केला होता. यावेळी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल, निशिकांत दुबे आणि इतर भाजप खासदार उपस्थित होते. मात्र, विरोधी पक्षाचा एकही खासदार दिसत नव्हता.
एनडीएची ताकद मजबूत
लोकसभेत ५४२ पैकी २९३ खासदार एनडीएसोबत असून, काही अपक्षांचा पाठिंबाही बीजेपीला मिळू शकतो. टीडीपी, जदयू आणि लोजपा (रामविलास) यांनी सुरुवातीला काही आक्षेप घेतले होते, पण संयुक्त संसदीय समितीने त्यांचे काही उपाय स्वीकारल्याने ते विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यास राज्यसभेतही एनडीएची संख्याबळाची बाजू मजबूत आहे. Waqf Amendment Bill |
हेही वाचा:




