Akshay Kumar : वजन कमी करायचंय? अक्षय कुमारने सांगितला सर्वात सोपा फॉर्म्युला; वाचा फिटनेस मंत्रा…
अक्षय कुमार अनेक वर्षांपासून नियमित दिनचर्येचे पालन करतो. तो पहाटे लवकर उठतो, नियमित व्यायाम करतो आणि वेळेवर आहार घेतो.

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे, तर तंदुरुस्त जीवनशैली आणि फिटनेससाठीही ओळखला जातो. वयाच्या ५८ व्या वर्षीही त्याची ऊर्जा, चपळता आणि फिटनेस पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात. नुकतंच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षय कुमारने पुन्हा एकदा आरोग्य आणि वजन नियंत्रणाबाबत महत्त्वाचा संदेश दिला आहे.
योग दिनाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना अक्षय म्हणाला की, अनेक लोक त्याच्याकडे वजन कमी करण्यासाठी सल्ला मागतात. व्यायाम, डाएट आणि विविध उपाय करूनही वजन कमी होत नसल्याची तक्रार अनेक जण करत असतात. मात्र, त्यावर त्याने अतिशय सोपा उपाय सुचवला आहे.
अक्षय कुमारच्या मते, संध्याकाळचे जेवण वेळेत करणे ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची सवय आहे. तो म्हणाला, “जर तुम्ही संध्याकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत तुमचे जेवण पूर्ण केले, तर तुमच्या आरोग्यात मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. शरीर अधिक सक्रिय राहते, पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.”
त्याच्या मते, जेवण आणि झोप यामध्ये पुरेसा वेळ असणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी साठण्याची शक्यता कमी होते आणि शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
“रात्री उशिरा जेवून वजन कसे कमी होणार?”
यावेळी अक्षयने रात्री उशिरा जेवणाऱ्या लोकांबद्दलही आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, “काही लोक रात्री १० किंवा साडेदहा वाजता जेवतात आणि नंतर वजन कमी होत नसल्याची तक्रार करतात. असे केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी जेवणाची वेळ सुधारणे आवश्यक आहे.”
शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे मिळते फिटनेसची साथ
अक्षय कुमार अनेक वर्षांपासून नियमित दिनचर्येचे पालन करतो. तो पहाटे लवकर उठतो, नियमित व्यायाम करतो आणि वेळेवर आहार घेतो. फिट राहण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स किंवा अत्याधुनिक उपायांपेक्षा चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैली अधिक महत्त्वाची असल्याचे तो नेहमी सांगत असतो.
हे देखील वाचा : Akshay Kumar : अक्षय कुमार भोजपुरी अंदाजात; ‘घिस घिस घिस’ गाण्यामुळे ट्रोल
याच सवयींमुळे आजही तो स्वतःपेक्षा कमी वयाच्या कलाकारांना फिटनेसच्या बाबतीत कडवी स्पर्धा देताना दिसतो. त्याचा फिटनेस अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जातो.
अक्षय कुमारचा वर्कफ्रंट
दरम्यान, कामाच्या आघाडीवर अक्षय कुमार नुकताच भूत बंगला या चित्रपटात झळकला. या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत तब्बल १४ वर्षांनंतर काम केले. या जोडीने यापूर्वी बॉलिवूडला अनेक गाजलेले विनोदी चित्रपट दिले आहेत.






