Wanawadi Murder Case – वानवडीत एका तरुणाचा अमानुष छळ करून खून झाला. आरोपींनी हा प्रकार लपवण्यासाठी अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एका गुप्त फोनमुळे पोलिसांनी हा प्रकार उघड करत चार सख्या भावांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये गौरव माजी (२२), सचिन माजी (२३), मोनू माजी (२६) आणि बंटी माजी (१८ सर्व रा. शंकर मठ, पावर सोसायटी, वैदुवाडी, हडपसर) यांचा समावेश आहे. हे चौघेही भाऊ इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतात. तसेच त्यांच्या घरी कबुतराच्या ढाबळीही आहेत. घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रुपेश धनराज शिंदे (१९, रा. मोशी) असे असून, तो शिक्षण घेत होता. याप्रकरणी त्याचे वडील धनराज शिंदे यांनी वानवडी ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी (दि. १८) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास रुपेश मित्र अजय टिंगरेसह दुचाकीवरून मोशीकडे जात होता. हडपसरमधील शंकर मठ परिसरात ते लघुशंकेसाठी थांबले. जवळच्या कॅनॉललगतच्या मोकळ्या जागेत ते गेले असता, तेथील कबुतरांच्या पिंजऱ्याजवळ कुत्रे भुंकू लागले. संशय आल्याने काही रहिवाशांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. भीतीपोटी दोघे पळू लागले. मात्र, जिनमाता मोटर्ससमोर रुपेशचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्याच क्षणी तो आरोपींच्या तावडीत सापडला. संशयितांनी रुपेशला पकडून लाकडी बॅट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याला कबुतरांच्या ढाबळीला बांधून ठेवण्यात आले. रात्रभर छळ सहन केल्यानंतर सकाळी सहा वाजता रुपेशला उलट्या होऊ लागल्या आणि तो बेशुद्ध पडला. अपघाताचा बनाव असा फसला घाबरलेल्या आरोपींनी बचावासाठी अपघाताचा बनाव रचला. त्यांनी रुपेशला प्रथम जवळच्या रुग्णालयात आणि नंतर ससूनला नेले. मात्र, ससूनमध्ये पोहोचण्यापूर्वीच रुपेशचा मृत्यू झाला होता. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या खबऱ्याने घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत चौकशी केली.सुरुवातीला अपघाताची कथा सांगणाऱ्या संशयितांनी पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. कबुतर चोरीच्या संशयातून त्याला मारहाण केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारकेले, रविंद्र रोकडे, अमोल राऊत, दिलीप गोरे यांचा समावेश होता.