संतोष देशमुख प्रकरण: फरार वाल्मिक कराडांच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. अद्याप कराड फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणी आज सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे.
खंडणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार –
वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणी गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचे पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे –
माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे मत मस्साजोग येथील हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने व्यक्त केले आहे. आज रेणापूर मध्ये शांततेत महामोर्चा झाला. बीड मध्येही या प्रकरणी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याबाबत मोर्चा निघणार आहे. वैभवी म्हणाली, माझे वडील मला पोरके करून गेले. मात्र यानंतर कोणीही पोरके होऊ नये, आणि आमच्या पाठीशी त्यांनी कायम राहावे, अशी अपेक्षा वैभवी देशमुखने व्यक्त केली.
सकल मराठा समाजाच्या वतीने बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख या देखील आल्या होत्या. संतोष देशमुख यांच्या हत्येला 18 दिवस पूर्ण झाले असले तरी देखील अद्याप सर्व आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. त्यामुळे आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी मी मोर्चात सहभागी झाले असल्याचे वैभवी देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याचे पडसाद राज्यभरात उमटले. विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील या हत्या प्रकरणी विरोधकांच्या वतीने सरकारला धारेवर धरण्यात आले होते. मात्र, असे असताना देखील अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. या विरोधामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रेणापूर तालुक्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्या बीड शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चा –
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखयांच्या हत्येचा निषेध नोंदवून याप्रकरणातील मास्टर माइंडसह फरार तीन आरोपींना अटक केली जावी, जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखली जावी, यासाठी उद्या (शनिवार, २८डिसेंबर) बीड शहरात सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय मूक मोर्चा काढला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सात पैकी केवळ चार आरोपी पोलिसांनी पकडले असून मास्टर माइंडसह अन्य तीन आरोपी फरार आहेत. पंधरा दिवस उलटूनही या गुन्ह्यातील आरोपी पकडले जात नाहीत.





