Wall Collapse Accident : काळजाचा थरकाप! तळवड्यात भिंत कोसळून पती-पत्नीचा जागीच मृत्यू; दोन चिमुरड्यांच्या छत्र हरपलं
Wall Collapse Accident : ळवडे येथील ज्योतिबा नगरमध्ये वॉल कंपाऊंड कोसळून भीषण अपघात; चाकणमधील राठोड दाम्पत्याचा जागीच मृत्यू, एक मजूर जखमी.

Wall Collapse Accident – तळवडे येथील ज्योतिबा नगर परिसरात सुरू असलेल्या वॉल कंपाऊंडच्या बांधकामादरम्यान अचानक भिंत कोसळून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १३) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आणखी एक मजूर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन शंकर राठोड (वय ३०) आणि कोमल सचिन राठोड (वय २५, दोघेही रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. लोहा, जि. नांदेड) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
तर मनोहर भिकू चव्हाण (वय ३८, रा. गाडगे आळी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा नगर परिसरात जागामालक सदाशिव आगळे यांच्या इंडक्शन थर्मल कंपनीच्या खुल्या प्लॉटभोवती वॉल कंपाऊंड उभारण्याचे काम सुरू होते. हे काम करण्याचे कंत्राट दीपक देवाजी जाधव (रा. चाकण) यांना देण्यात आले होते. त्यानुसार जाधव यांनी मजुरीसाठी लेबर नाक्यावरून मजूर आणले होते.
शुक्रवारी सायंकाळी भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली. या भिंतीखाली सचिन राठोड आणि त्यांची पत्नी कोमल राठोड अडकले. गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोहर चव्हाण किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने चिखली येथील इम्पेरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मयत पती-पत्नीस दहा आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. त्याचा पुढील देखभालीसाठी संबंधित कंपनी आणि ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावी, अशी नातेवाईकांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला. मात्र पोलीस उपनिरीक्षक सावन वाघमारे यांनी मध्यस्थी करीत नातेवाईकांची समजूत काढली. अपघाताच्या या घटनेमुळे चाकण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





