Walhe Yatra : वाल्ह्यात गुलालाची उधळण आणि ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा जयघोष; १२ तास रंगली ग्रामदैवतांची वरात
Walhe Yatra : ढोल-ताशांच्या तालावर १२ तास रंगली ग्रामदैवतांची वरात; आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळले वाल्हे.

Walhe Yatra – वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशी ग्रामदैवतांची वरात फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल- ताशा, सनईच्या सुरात, गुलालाची मुक्त उधळण करीत काढण्यात आली. रविवार (दि.१२) मध्यरात्री १२ दरम्यान ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचे पुजारी सचिन आगलावे यांनी दीपमाळ पेटताच वरातीची लगबग सुरू झाली. तब्बल १२ तास ग्रामदैवतांची वरात रंगली. दरम्यान, उत्सव मूर्तींना नवीन वस्त्र परिधान करण्यात आले.
वरातीच्या अगोदर मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवाला सुगंधित आत्तर लावून (नवरदेव-नवरीला) औक्षण करून हळदीच्या दुधाचा नैवेद्य दाखवून देवाला सोनं लावण्यात आले. सुवासिनींनी देवीची ओटी भरून तांबोळी परिवाराकडून मानाचा पंचदाणी (पाच पानाचा) पानाचा विडा भरविण्यात आला. दरम्यान, देवाची दृष्ठ काढून यानंतर उत्सव मूर्तींना पालखी ठेवण्यात आले.
यावेळी पालख्यांची सजावट करून गुलालाची मुक्त उधळण करीत आकर्षक फाटकांच्या आतषबाजीत “नाथ साहेबाच चांगभलं” च्या जयघोषात वरात मध्यरात्री १ नंतर देवाची वरात मंदिरांच्या बाहेर निघाली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा मागील पाच दिवसांपासून सुरू आहे. यावेळी देवाच्या काठी, पालख्या फुलांनी सजवून विद्युत रोषणाई केली होती.
ढोल, ताशा, सनईच्या तालावर आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची मुक्त उधळण करीत छबिना मुख्य बाजार पेठेतून सर्व पालख्यांना आपापल्या ठिकाणी पोहोचवले जाते. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण व आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करीत “नाथ साहेबांच चांगभलं” अशा गजरामध्ये छबिना सह ग्रामदैवतांची वरात सोमवार (दि.१३) दुपारी सव्वाबारा वाजता तब्बल १२ तासांनी संपली.
कुंभार समाजाकडून पान- सुपारी वाटप
शेवटी नाथांचे मुख्य ठाण असलेल्या कुंभारवाडा येथे देवाची वारात पोहोचली. यावेळी कुंभारवाडा येथील देवघर येथे वरातीचे स्वागत फुलांच्या पायघड्या, आकर्षक रांगोळी रेखाटून करण्यात आले होते. यावेळी समाज आरतीनंतर कुंभार समाजाच्या वतीने उपस्थित भाविकांना पान-सुपारीचे वाटप करून वरातीची सांगता करण्यात आली. यावेळी मानकरी, सालकरी, भाविक-भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






