“प्रभात’च्या दणक्याने बांधकाम विभागाला जाग

सासवड -“पिंपरीत निकृष्ट कामांचा धूमधडाका’ या मतळ्याखाली दैनिक “प्रभात’ने रविवारी (दि. 13) वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले अन् ठेकेदाराला काम पुन्हा नव्याने चांगल्या प्रतिचे साहित्य वापरून करण्याची तंबी देण्यात आली आहे.
हंबीरवाडी ते मावडी रस्त्यावरील शेंडकरमळा येथे साकव पुलाचे काम सुरू आहे. यामध्ये गाळ मिश्रित मातीचा वापर केला जात होता. तसेच हंबिरवाडी जवळ चार दिवसांपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. या रस्त्यावरील डांबर हाताने उकरत आहे. या दोन्ही कामांची
सरपंच दिलीप शेंडकर, उपसरपंच मोहिनी हंबीर व ग्रामस्थांनी पाहणी करून नाराजी व्यक्त केली होती. याची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदाराने तात्काळ दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. वाय. चावरे यांनी दोन्ही कामांची पाहणी केली.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात सध्या अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत.यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाली असून काही सुरू आहेत .याबाबत संबंधित विभाग डोळेझाक करीत आहेत. ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. हंबीरवाडी येथील रस्त्याची व जवळील पुलाची पाहणी केली आहे.
ठेकेदारांना संबंधित रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा करावयास सांगितले असल्याचे पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. वाय. चावरे यांनी सांगितले.





