अपघात समयी “गोल्डन अवर’ची प्रतीक्षा; शिंदे-फडणवीस सरकार मदतीला धावणार का?

राहुल गणगे
पुणे – देश, राज्यात प्रत्येक शंभर किलोमीटर अंतरावर एक ट्रामा केअर सेंटर असावे, असे राज्य सरकारचे धोरण आहे. राष्ट्रीय महामार्गावर गंभीर अपघात होतात. अशा गंभीर अपघातातील रुग्णांना गोल्डन अवर म्हणजे वेळेत एक तासाच्या आत उपचार मिळाले, तर त्याचे प्राण वाचण्याची संधी असते. परंतु राज्यात कोणत्याही महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुस्थितीत असल्याचे दिसून येत नाही. याचा फटका अपघात समयी राज्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार अपघात समयी मदतीला धावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सर्वच महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणातमोठी वाढ झाली आहे. अशा गंभीर अपघातातरुग्णांना उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागत आहे.सध्या वाहनांची संख्या पाहता पुणे जिल्ह्यातील महामार्गांवर वाहतुकीची समस्या जटील झाली आहे. जर सरकारच्या धोरणामुळे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आली तर अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळून रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्यसरकारने महामार्गालगत ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणी आता गावागावांतून होऊ लागली आहे. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला.
मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाक्याजवळ मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर मेटे यांना जवळपास एक तास कसलीही मदत मिळाली नव्हती. तसेच जवळपास एकही रुग्णालय नसल्याने एका माजी आमदारांना आपला जीव गमवावा लागला. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्या बहिणींचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
दरम्यान पुणे – सोलापूर महामार्गाशेजारीच हाकेच्या अंतरावर नामांकित रुग्णालय व लोणी काळभोर पोलीस ठाणे आहे. तरीही डॉक्टर व रुग्णवाहिकासुद्धा उपलब्ध झाली नाही. यावेळी सुमारे एक तास या मुलींना मदत मिळाली नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अपघातसमयी मदत मिळण्याऐवजी अपघातानंतर मदतीची याचना करण्याची वेळ अपघातग्रस्त, नातेवाइकांवर आली होती. त्यामुळे महामार्गावर रुग्णालयांची नित्तांत आवश्यकता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे – सोलापूर महामार्ग हा चारपदरी आहे. पण आता वाढत्या शहरीकरणामुळे या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे. त्यात अनेक ठिकाणी सर्विस रस्ता नसल्याने याआधीही अनेक अपघात झाले, तेव्हाही पाठपुरावा करूनही प्रशासनाने ज्या वेगाने उपाययोजना करणे अपेक्षित होते ते घडले नाही. येत्या काळात या भागात मेट्रो येणार असल्याने हडपसर – उरुळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉर बनला पाहिजे, अशी आग्रही मागणी गडकरी यांना केली आहे.
– अमोल कोल्हे, खासदार शिरूर
यवतचे ट्रॉमा केअर सेंटर लालफितीत
यवत (ता. दौंड) येथे पुणे – सोलापूरमहामार्गालगत अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या इमारतीच्या कामासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. करोना काळात याठिकाणी कोविड सेंटर उपलब्ध करण्यात आले होते. त्याकरिता संपूर्ण सुविधा व स्टाफ उपलब्ध झाला होता. परंतु संपूर्ण इमारत तयार असूनही ट्रॉमा केअर सेंटर लालफितीत अडकल्याची चर्चा मात्र संपूर्ण दौंड तालुक्यात सुरू आहे. याकडे कोणीही आमदार, खासदार लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.





