प्रतिक्षा १० जूनची! अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

Ajit Pawar : १० जूनला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन बालेवाडी संकुल येथे तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम घेणार आहेत. दोन्ही गट आपापल्या विचारसरणी आणि धोरणांवर चर्चा करणार आहेत. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष काही गंभीर प्रकरणावर मोठा निर्णय घेण्याची तयारीत आहेत, असे बोलले जात आहेत. बीड जिल्हा युनिटचे बरखास्तीकरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर माजी अध्यक्ष दीपक मानकर यांचा राजीनामा आणि सध्या राज्यात गाजत असलेले वैष्णवी हगवणे प्रकरण आणि या प्रकरणात राजेंद्र हगवणे यांचे आलेले नाव या मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे.
चर्चांना पूर्णविराम
वरिष्ठ नेतृत्वाने सर्व गुन्हेगारी प्रकरणांची दखल घेतली आहे. पक्षातील सर्व सदस्यांना कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या जातील, अन्यथा पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. यावर बोलताना तटकरे यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिला. आम्हाला असा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही, असे ते म्हणाले.
वर्धापनदिनाच्या बैठकीत पक्षाची भविष्यातील रणनीती आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. गुन्हेगारी प्रकरणांमुळे पक्षाच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामाची दखल घेण्यात आली आहे. पारदर्शी नेतृत्वाला प्राधान्या देणार असल्याचे देखील तटकरे यांनी स्पष्ट केले. यामुळे आता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार काय निर्णय घेतात आणि पक्षाची आगामी काळातील रणनिती काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलले आहे.
हेही वाचा: एकनाथ शिंदे विमानतळावर ताटकळले; पायलटचे विमान उडवण्यास नकार; नेमकं काय घडलं?





