निकालाची प्रतीक्षा करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसे स्पष्ट केले आहे. सध्या हे प्रकरण बरेच गाजते आहे. खरेतर एका आत्महत्येचा अथवा हत्येचा किंवा आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा हा गंभीर विषय. “गाजते’ हा शब्दप्रयोग येथे चुकीचा ठरतो. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता या विषयाला एका चित्रपटाच्या कथेसारखी वळणे दिली गेली. त्यामुळे विषय राजकारणाचा आणि मनोरंजनाचा आणि आरोप-प्रत्यारोपांचा ठरतो की काय असे वाटू लागले नव्हे, तर तसाच झाला.
सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी धक्क्यात होती. त्याच्या चाहत्यांनाही हा धक्काच होता. छोट्या पडद्यावर यश मिळवून मोठा पडदाही काबीज करणारे कलाकार तसे मोजकेच. नाही म्हणायला बरेच कलाकार मोठ्या पडद्याकडे येतात. पण त्यांना यश मिळवता येतेच असे नाही. सुपरस्टार शाहरूख खान याच्यानंतर असे लक्षणीय यश मिळवणारा सुशांत पहिलाच. फार कमी काळात त्याने बरीच मजल मारली. अनेक यशस्वी चित्रपट दिले. दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले. मोठ्या निर्मात्यांनी त्याला करारबद्ध केले. तो प्रस्थापित झाला होता. चांगले पैसे त्याने कमावले. त्याच्या जीवनशैलीच्या चर्चा झाल्या. त्याच्या खर्चाच्या चर्चा झाल्या. त्याच्या मैत्रिणींच्याही चर्चा झाल्या.
मात्र, हे यश दिसत असले तरी त्यामागे त्याचे कठोर परिश्रम होते. अशा कलाकाराने अचानक आपला डाव अर्ध्यातच मोडला की ती घटनाच हादरवणारी असते. का आणि कसे, असे दोन प्रश्न निर्माण करून तो गेला. त्याची हत्या झाली की खरेच आत्महत्या याबाबत तर्क केले जात आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत. कारण या प्रकरणात चित्रपटसृष्टी आणि राजकारणातीलही काही बड्या मंडळींची नावे घेतली गेली. त्यांनी त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले की नाही, हे यथावकाश स्पष्ट होईलच.
मात्र या विषयाला रितसर हवा दिली गेली. बॉलीवूडचे मुख्यालय अर्थातच मुंबई. सुशांतने येथेच आत्महत्या केल्याने तपास मुंबई पोलिसांनीच करायचा हे ओघाने आले. सर्व शक्यता पडताळून त्यांनी अनेक नामवंतांना चौकशीला बोलावले. त्यांचे जबाब नोंदवले. दोन महिने झाले तरी मात्र त्यांना नेमका मार्ग सापडला नाही. दरम्यानच्या काळात सुशांतच्या आजी माजी मैत्रिणींचेही समाज माध्यमांवर व्यक्त होणे झाले. त्यात त्याच्या रिया चक्रवर्ती नामक प्रेयसीवर संशयाची सुई स्थिरावली. केवळ रियाच नव्हे, तर तिच्या कुटुंबातील सगळेच सदस्य संशयाच्या भोवऱ्यात सापडले. सुशांतच्या नावाने निर्णय घेणे आणि बरेचसे आर्थिक व्यवहार करण्याची तिला मुभा होती.
असेही त्याच्या काही निकटवर्तीयांच्या जबाबातून समोर आले. मात्र हे त्याला माहीत असायचे की नाही, याबाबत स्पष्टता नाही. सुशांतच्या मृत्यूनंतरही आयपी ऍड्रेस बदलणे वगैरे सारख्या संशयास्पद बाबी झाल्या. दरम्यानच्या काळात रियाच भूमिगत झाली. हे सगळे एकीकडे होत असताना सुशांतच्या पित्याने बिहारमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, येथेच राजकारणाला सुरुवात झाली. कदाचित बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा अँगल त्याला असावा. तद्वतच महाराष्ट्रातील राजकारणाला फोडणी देण्याचीही नामी संधी विरोधकांना यात दिसली. त्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण मंत्री असलेल्या मुलाचा या प्रकरणात उल्लेख आल्यावर प्रकरणाला अत्यंत हॉट दर्जा प्राप्त झाला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्वत: खुलासा केला. त्यांनी अर्थातच पक्षाला आणि त्यांना बदनाम करण्याचे हे कारस्थान असल्याचे सूतोवाच केले. मात्र त्यांच्या पित्याकडून अथवा पक्षाकडून दुखावलेल्या मंडळींना परतायला एवढी भाजणी पुरेशी होती. मुंबई पोलीस यात विनाकारण भरडले गेले. पोलीस मग ते कोणत्याही शहराचे अथवा राज्याचे असोत, त्यांचे काम निष्ठेने करतात. थोडा दबावाचा अथवा अप्रामाणिकपणाचा भाग सोडला तर पोलिसांच्या दृष्टीने गुन्हा ही एक केस असते. हाय प्रोफाइल लोकांचा एखाद्या गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे सूचित झाले की बिचाऱ्यांचे काम वाढते.
माध्यमांच्या प्रश्नांच्या फैरी, राष्ट्रीय वाहिन्यांवर सतत दळले जाणारे दळण आणि विचारले जाणारे प्रश्न यामुळे तो विषय जिवंत राहतो आणि पोलिसांची अडचण होते. तपास करायचा की उत्तरे आणि खुलासे देत बसायचे हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचे काहीसे असेच झाले आहे. तपास प्रक्रियेशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्यांनी काही टिप्पणी करायची आणि विषय तापवत ठेवायचा असाच प्रकार सुरू आहे. सुशांतच्या वडिलांमुळे बिहार पोलिसांची यात एंट्री झाली. त्यामुळे हा कथित आत्महत्येचा विषय दोन राज्यांच्या संघर्षाचा होऊन बसला. त्यातले एक राज्य निवडणुकीला सामोरे जाणारे. तेथील पूर, करोना हे गंभीर प्रश्न बाजूला पडले आणि सुशांत त्यांचा प्रचाराचा मुद्दा झाला.
मध्यंतरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या विषयावर टिप्पणी केली. सीबीआय तपास करत असेल तर हरकत नसावी असे त्यांनीही सांगितले. मात्र, पवारांच्या या वक्तव्यापेक्षा त्यांनी त्यांच्या कुटुंबातीलच एका सदस्याची जाहीर कानउघाडणी केल्यामुळे जास्त हवा दिली गेली. थोडक्यात, सुशांतचे मारेकरी कोण, हे जेवढ्या शिताफीने आणि वेगाने शोधणे गरजेचे होते, ते झालेच नाही. कोणत्याही गुन्ह्याचा तपास कोणत्या संस्थेकडे देणे हा खरेतर वादाचा मुद्दा असताच कामा नये. मात्र, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षड्यंत्र ते अखेर सत्याचा विजय झाला येथपर्यंतची वक्तव्ये जबाबदार नेत्यांनी केली. ते लाजीरवाणे. न्यायालयांच्या बाहेरच जाहीर न्यायालये चालवण्याचा हल्ली जो ट्रेंड आला आहे, त्याला साजेशा अशाच या सगळ्या गोष्टी. सुशांतच्या आत्महत्येने बॉलीवूडमधील अनेक काळ्या बाबींवर प्रकाश टाकण्याचे काम केले होते. येथे चालणारी घराणेशाही, स्वप्ने उराशी घेऊन मुंबईत दाखल होणारे युवक-युवती, त्यांचे होणारे शोषण, पिळवणूक, यश मिळाल्यानंतरही आलेले एकाकीपण आणि त्यातून उद्भवलेले नैराश्य, मूठभर लोकांची मक्तेदारी नव्हे दादागिरी असे कितीतरी गुंत्याचे विषय येथे आहेत.
त्याचा बीमोड करण्याची संधी होती. आरोप-प्रत्यारोपांच्या आणि बेगडी अभिमानाच्या लढाईत हे सगळे हरवतेय की काय, असे वाटू लागले होते. न्यायालयाने हस्तक्षेप करून आता त्यावर पडदा टाकला आहे. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी, सरकारांनी, विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी आता गप्प बसावे. तपासात काय समोर येते त्याची वाट पाहावी. अन्यथा मोठ्या गुन्ह्यांमागचे सत्य बऱ्याचदा उजेडात येतच नाही. त्यांच्या दंतकथा मात्र प्रचलित होतात. त्या बऱ्याच काळ चालत राहतात. त्यातून गुन्हेगार विशेषत: व्हाइट कॉलर गुन्हेगार सहीसलामत सुटतात आणि समाजात उजळ माथ्याने वावरत राहतात. त्याला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी आता सीबीआय व नंतर न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष देउन गप्प बसलेलेच बरे.





