Wai: गणेशोत्सवात ध्वनीवर्धकाला वाईकरांचा विरोध; पोलिसांकडून गणेश मंडळांना शिस्तीच्या सूचना
Wai उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, तो दररोज मंडळाला भेट देणार असल्याचे सांगितले.

Wai: गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी वाई पंचायत समितीच्या देशभक्त किसन वीर सभागृहात पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी गणेश मंडळांना विविध नियम व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, ध्वनीवर्धकाच्या मोठ्या आवाजाला उपस्थित वाईकर नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला.
यावेळी सूचना करताना पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सव काळात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, अफवा पसरवू नयेत, तसेच मंडप उभारणीपासून मिरवणुकीपर्यंत आवश्यक परवानग्या वेळेत घेणे बंधनकारक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मंडपात सीसीटीव्ही बसवावेत. रक्तदान, आरोग्य शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम राबवावेत. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे देखावे सादर करू नयेत. ध्वनी व वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, तो दररोज मंडळाला भेट देणार असल्याचे सांगितले. मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी. वाहनात स्फोटक पदार्थ नसावेत, गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवक नियुक्त करावेत.
दरम्यान, गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी देखाव्यांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी, महावितरणच्या धोकादायक तारांचा बंदोबस्त आणि नियमानुसार ध्वनीवर्धकाला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या मागणीला कडाडून विरोध केला. वाईचा गणेशोत्सव पारंपरिक, सुसंस्कृत आणि शांततेत साजरा व्हावा, अशी भूमिका नागरिकांनी मांडली.
बैठकीस जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, महिला दक्षता समितीच्या सदस्या जागृती पोरे, ज्योती गांधी, सुधा साबळे, मंजिरी पानसे, तनुजा इनामदार, सारिका गवते यांच्यासह शहर व तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.





