Wai News – वाई तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या भुईंज गावात मोठी बाजारपेठ आहे. आजूबाजूच्या गावातून वाड्या वस्त्यावरून लोक खरेदीसाठी, बँक किंवा इतर विविध शासकीय कामासाठी याठिकाणी ये जा करत असतात. परिरातूल लोक इथ येतात त्यावेळी बाहेरगावाहून आलेल्या महिलांना मठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. येथे कोठे स्वच्छतागृह आहे का, असा प्रश्न विचारावा लागत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मोठ्या गावात सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहवे लागत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य डॉ. सुरभी भोसले यांनी महिलांची समस्या लक्षात घेऊन महिलांसाठी स्वच्छतागृह उभारून महिला वर्गाची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी भुईंज गणातील महिला करीत आहेत. बँका, व्यापाऱ्यांची मोठी बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, खासगी क्लासेस असल्याने परिसरातील गावातून विद्यार्थी- विद्यार्थिनीं, महिला, नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी बस स्थानकामध्ये एकमेव स्वच्छतागृह आहे. ते कधी सुरु असते तर कधी पाण्यावाचून बंद राहते. तर मुख्य बाजार पेठातल्या नागरिकांना बस स्थानकापर्यंत जाणे शक्य होत नाही. याचाही विचार होणे गरजेचे झाले आहे. कित्येक जण खासगी हॉटेलच्या स्वच्छता गृहाचा वापर करताना दिसून येतात. मात्र, महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. यापूर्वीही अनेकांनी लोकप्रतिनिधित्व केले. मात्र, या सुविदा उपलब्ध करुन का दिल्या नाहीत, असा प्रश्न बाहेरगावातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांतून केला जात आहे. स्वच्छतागृहाच्या अभावामुळे पुरुष मंडळी चक्क उघड्यावर लघुशंका करताना आढळतात. मात्र, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून स्वच्छतागृहासाठी भुईंज ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करावी, अशी मागणी परिसरातील महिलांमधून व्यक्त होत आहे. गावात योग्य जागी स्वच्छतागृह उभारावी अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी निवडून आले आहेत. भुईंज जिल्हा परिषद गट व गणातून निवडून आलेल्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी भुईंजमध्ये स्वच्छतागृह व मुताऱ्यांची व्यवस्था करून महिलांची व सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय थांबवून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्ही तरी महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन भुईंजसारख्या मोठ्या गावात महिलांसाठी पुरेसे स्वच्छतागृह उभारून महिलांची होणारी गैरसोय थांबवा, अशी मागणी डॉ. सुरभी भोसले यांना महिला वर्गाकडून केली जात आहे.