Wai Dengue News: वाई तालुक्यात डेंग्यूचा धसका! भुईंज परिसरात तब्बल २५० संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क
Wai Dengue News: भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील देगाव, पाचवड, आसले आणि ओझर्डे परिसरात डेंग्यूचे २५० संशयित रुग्ण; खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू.

Wai Dengue News- भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील देगाव, भुईंज, पाचवड, आसले, धनगरवाडी, बदेवाडी, जोशी विहीर, ओझर्डे, परिसरात आतापर्यंत डेंग्यूचे 250 संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यातील काही रुग्ण खासगी, तर काही शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने या भागातील गावागावात अंगणवाडी सेविका आणि आशांद्वारे सर्वेक्षणासह आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक गावाकडे आले होते. गणेशोत्सव संपल्यानंतर परिसरात ताप, अंगदुखी, अशक्तपणा यांसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. त्यातच परतीचा पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
नागरिकांकडून ताप अथवा डेंग्यूची लक्षणे जाणवताच तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी घराभोवती पाणी साचू देऊ नये, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्यावतीने आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून, संशयित रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे.
साचलेल्या भांड्यामधील पाणी काढणे, जनजागृती करणे, संशयित रूग्णाला उपचारासाठी पाठवणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. डासांची उत्पत्तीस्थळे शोधून आवश्यक ठिकाणी धूरफवारणी करण्यात येत आहे. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी नागरिकांनी एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण…
“गणेशोत्सवाच्या काळात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांमुळे तसेच त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता आहे. भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.”
– डॉ. विनय भोईटे, तालुका वैद्यकीय अधिकारी.





