Wai Crime – भुईंज, ता. वाई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पाचवड बाजारपेठ परिसरात गत दहा दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ असून चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पाचवड परिसरातील व्यापारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पाचवड हे परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. त्या ठिकाणी असलेले गाळे कटरच्या साह्याने तोडून चोरटे आत प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून सुद्धा पोलिसांना मात्र चोरट्यांचा शोध घेणे अवघड होत आहे. परिसरात दुकानात किंवा घरात एखादी चोरीची घटना घडली की घरमालक अथवा दुकान मालक पोलिसात त्याबाबत तक्रार देतात. तक्रार नोंदवून घेतली जाते. मात्र, पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात नसल्याने चोरटे बिनदिक्कतपणे चोरी करताना आढळून येत आहेत. पोलिसांकडून या घटनांबाबत कोणताही तपास लागलेला नाही म्हणून नागरिकांसमोर आता चोरी झाल्यानंतर पोलिसात तक्रार द्यायची का नाही? असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना चोर सापडत नसल्याचे काही नागरिकांनी आरोप केले आहेत. या चोरीच्या घटना वर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त, स्वतंत्र तपास पथक, सीसीटीव्ही, रात्रगस्त वाढवणे आवश्यक आहे. पाचवड परिसरात चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असून परप्रांतीय भुरटे चोर मोकाटपणे धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या चोरावर कोणताही पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भुईंज पोलिसांच्या नोंदीत अनेक चोऱ्या होत असून त्यांचा तपास मात्र कागदावरच अडकलेला दिसून येत आहे. पोलीस सुस्त, चोरटे मस्त पाचवड परिसरात पोलीस सुस्त, चोरटे मस्त तर नागरिक त्रस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. चोरट्यांनी पाचवड परिसरात धुमाकूळ घातला असून या चोरीच्या घटना थांबवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसणे गरजेचे असून नागरिकांना या चोरांपासून भयमुक्त करणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. दुकान फोडले जाईल का? घरात चोरी होईल का? वाहन गायब होईल का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात घोंघावत आहेत.