Wagholi water crisis : ३० कोटींची पाणी योजना धुळखात! वाघोलीकरांना पाणी विकत घेण्याची वेळ

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – येथील नागरिकांसाठी ग्रामपंचायत, तसेच इतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने तीस कोटी रुपये खर्चून होत असलेली पाणीपुरवठा योजना सध्या बंद असल्याने धुळखात पडली आहे.वाघोलीतील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असून तातडीने ही योजना कार्यान्वित करावी अशी मागणी वाकोचे प्रतिनिधी अनिल कुमार मिश्रा यांनी केली आहे. याबाबतीत अनिल कुमार मिश्रा यांनी सांगितले की बकोरी रोड, गाडे वस्ती, कटकेवाडी, विठ्ठलवाडी, आयव्ही इस्टेट, केसनंद रोड परिसरातील लाखो रहिवाशांना आजही हक्काचे पाणी मिळत नाही.
पीएमआरडीएकडून 23 कोटी रुपयांचा आणि 50 लाख लिटर क्षमतेचा पाणी प्रकल्प सप्टेंबर 2019 मध्ये रमतगमत पद्धतीने सुरू झाला जो सप्टेंबर 2020 ला पूर्ण करायचा होता. पाठपुरावा, आंदोलने, अर्ज, आणि जनआवाजानंतर काही महिन्यांपूर्वी हा प्रकल्प पूर्ण झाला, तरीही तो जाणूनबुजून बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या 5 वर्षांपासून वाघोलीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे? कोणाच्या दबावाखाली हा प्रोजेक्ट सुरू केला जात नाही? कोणते अधिकारी किंवा प्रभावशाली लोक जनतेच्या हक्काच्या प्रकल्पाला अडथळा आणत आहेत?
हा प्रकार थेट भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांचा गैरवापर, आणि रहिवाशांची फसवणूक आहे. जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेला प्रकल्प जर जनतेपर्यंत पोहोचत नसेल – तर जबाबदार अधिकार्यांवर कारवाई अटळ आहे!वाको वेलफेअर असोसिएशन (टीम वाको) लवकरच संबंधित पी एम आर डी आयुक्त यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करणार असल्याचे अनिल कुमार मिश्रा यांनी सांगितले.
“वाघोली मधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने पीएमआरडी आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त यांची संयुक्त भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे.”
-वसुंधरा शिवदास उबाळे, माजी सभापती, पंचायत समिती हवेली

