वाघोली : वाघोली येथील माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील आणि वाघेश्वर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांच्या कुटुंबाने वाघेश्वर मंदिर परिसरात दशक्रिया विधींसाठी येणाऱ्या महिला व पुरुषांना ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळावे यासाठी आधुनिक शेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 20 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, सातव कुटुंबाच्या या सामाजिक बांधिलकीचे वाघोलीत सर्वत्र कौतुक होत आहे. सातव कुटुंबाने गावातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नेहमीच हातभार लावला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महिला बचत गट, विविध मंदिरांचे व्यवस्थापन, तसेच विविध धार्मिक सण, युवक आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मोलाची आर्थिक आणि सामाजिक मदत केली आहे. माजी सरपंच जयश्री सातव पाटील आणि माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सामाजिक सलोखा आणि दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. वाघेश्वर मंदिर परिसर, संचालक मंडळ, ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. दशक्रिया विधींसाठी आधुनिक शेड उभारणीच्या या उपक्रमासाठी सातव कुटुंबाने पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.