Wagholi : भाजपच्या पंचायत समिती सदस्यासह 13 जणांवर गुन्हा
Wagholi : केसनंद ग्रामपंचायत आंदोलन प्रकरण

Wagholi : केसनंद ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकून कथित कचरा गैरव्यवहाराविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या पंचायत समिती सदस्यासह १३ जणांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
याप्रकरणी केसनंद ग्रामपंचायतीचे प्रशासक विशाल बाजीराव हरगुडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून ढोल-ताशांच्या गजरात ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून दुर्गंधीयुक्त कचरा व राडारोडा ग्रामपंचायत कार्यालयात आणला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकून नागरिकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग अडविल्याचा आरोप आहे.
तसेच ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला एक व्यक्ती कचरा खात असल्याचे दर्शविणारा पोस्टरचा हार घालून शासकीय मालमत्तेचे विद्रूपीकरण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज व नागरिकांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाला असून, प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदनामी झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी केसनंद येथील भाजपचे पंचायत समिती सदस्य कुशाल गोरख सातव, सदाशिव तांबे, गणेश बांगर, यशवंत बांगर, अक्षय बांगर, जितेंद्र जाधव, मंगेश सातव, विकास ढोरे, विशाल सातव, महेश सातव, शेखर सातव, नवनाथ दिघे, सुशांत हरगुडे यांच्यासह अन्य ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





