wagholi News : लोणीकंद पोलिसांनी जमीन ताब्यात घेण्याचा प्रकार हाणून पाडला

वाघोली – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मगर वस्तीवर जमीन ताब्यात घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना योग्य ती कायदेशीर समज देऊन पोलिसांनी ताब्याचा प्रकार हाणून पाडला आहे.
मगर वस्तीवरील जागेत न्यायालयीन दावे दाखल असून यापूर्वी देखील जमीन ताब्यात घेण्याचे प्रकार घडले होते. बाहेरच्या व्यक्तींच्या मदतीने जमीन ताब्यात घेण्यासाठी आलेले व्यक्तींची माहिती शेतकऱ्यांनी पोलिसांना कळवून तातडीने पोलिसांचे पथक दाखल होऊन जमीन ताब्यात घेण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला आहे.
कुख्यात गुंड टिपू पठाण इतर गुंडांचा वापर ही जमीन ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तरीदेखील येरवडा जेलच्या एका माजी जेलरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकार चालू असल्याचा आरोप करत तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यांनी दाखल केली आहे. सध्या सोशल मीडियावर या ताब्याच्या प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
शेत जमिनीचे प्रकरण एकीकडे मिटवण्याचे नाटक करून दुसरीकडे ताबा घेण्यासाठी येरवड्याच्या माजी जेलर प्रयत्न करत असल्याचे रेकॉर्डिंग देखील पोलिसांकडे शेतकऱ्यांनी दिले आहे.
ताबा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची चारित्र्य पडताळणी करून बेकायदेशीरपणे शिरकाव करून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुनील सोनवणे, अक्षय सोनवणे, संजय मगर, स्वप्निल मगर या शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
मगर वस्तीवरील जमिनीच्या ताब्याबाबत शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर तातडीने पथक पाठवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळात असे प्रकार घडले तर कडक कायदेशीर कारवाई करणार आहे.
– सर्जेराव कुंभार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद





