वाघोली : वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रात्रीच्या वेळी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पेपर लिहण्यास देण्याचा गैरप्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर वाघोली येथील किशोर सातव यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉलेजमधील अनियमिततांबाबत गंभीर आरोप केले. सातव यांनी सांगितले की, अटकेत असलेला प्राध्यापक प्रतीक सातव हा पूर्वी कॉलेजचा मुख्य परीक्षा अधिकारी होता. त्याच्या गैरकृत्यांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे यापूर्वीच लेखी तक्रार करण्यात आली होती. परीक्षा विभागाचे संचालक महेश काकडे यांनी नवीन परीक्षा अधिकारी नेमण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने गैरप्रकार सुरूच राहिले. सातव यांनी विद्यापीठाने नेमलेल्या तपास समितीच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त केली, कारण यापूर्वीही अशी समिती नेमली गेली होती, परंतु कारवाई झाली नाही. तसेच, कॉलेजकडून विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याची तक्रार शुल्क नियमन समितीकडे केली असल्याचे त्यांनी नमूद केले. सातव यांनी मागणी केली की, कॉलेजने आकारलेले अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जावे आणि विद्यापीठाने या कॉलेजचे परीक्षा केंद्र दुसरीकडे हलवावे.