Wagholi accident : वाघोलीत भीषण अपघात! डंपरखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौकात रविवारी (दि. 28) सकाळी आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारती प्रकाश देठे ( वय 45, रा. विश्रांतवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारती या दुचाकीवर जात होत्या. वाघेश्वर मंदिर चौकात डंपर भावडी रोड कडे वळत होता.
त्यांच्या दुचाकीला डंपर चा धक्का लागला. त्यामुळे दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपर च्या मागील चाकाखाली आल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीच्या नंबर वरून त्यांची माहिती काढून नातेवाईकांना कळविण्यात आले. या प्रकरणी डंपर चालक हिंमत जालिंदर कारके (वय 42, रा वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी दत्तातेय राजू गोरे यांनी फिर्याद दिली.
प्रशासन, भ्रष्ट अधिकार्यांचा निषेध..
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेला छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाघोली ग्रामस्थांच्या वतीने अर्पण करण्यात आली. घरातून बाहेर पडल्यावर घरी सुखरूप येईल का नाही याची शास्वती आज नाही, प्रशासनाची भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत आहे, बेकायदेशीर वाहनांकडे दुर्लक्ष केले जात, भ्रष्ट अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा कडक शब्दात उपस्थित नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.





