Wagh Nakh । Indian History: भारतातील ‘या’ ऐतिहासिक कलाकृती अजूनही आहेत देशाबाहेर; परदेशी नागरिकांनासुद्धा पडलेली यांची भुरळ, पाहा…

Chhatrapati Shivaji Maharaj | Wagh Nakh | Indian History: प्रतापगडावरील अद्वितीय शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारी शिवरायांची ऐतिहासिक वाघनख राजधानी साताऱ्यात दाखल झाली आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव वाघनखांची मिरवणूक काढता आली नाही. असे असले तरी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं सर्वप्रथम साताऱ्यात आणण्यात आली आहेत आणि ती आपल्याला प्रत्यक्ष पाहता येणार आहेत.
ऐतिहासिक आणि एकमेवाद्वितीय वाघनखं छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आली असून त्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघनखांच्या स्वागत व अनावरण करण्यात आलं आहे. आता ही वाघनखं शिवप्रेमींसाठी पाहण्यास खुली झाली आहे.
वाघनखांना मराठीत वाघनख्या असा पर्यायी शब्द असून हिंदीमध्ये यांना बाघनखं व इंग्रजीत ‘Tiger Claws’ म्हणून ओळखले जाते. वाघनखे या नावातच सर्व काही आहे. अतिशय प्रबळ असा वाघ जसा आपल्या शिकारीचा फडशा पाडण्यासाठी शक्ती, चपळता, तीक्ष्ण दांत आणि नखांचा वापर करतो. वाघाच्या याच मूलभूत अंतःप्रेरणेचा अभ्यास करून वाघनखं तयार करण्यात आली.
वाघनखांचे सर्वात मुख्य वैशिट्य म्हणजे या शस्त्राचा पहिला ज्ञात प्रयोग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असल्याने त्यांनाच वाघनखं या शस्त्राचे जनक म्हटले जाते. भारतीय इतिहासकारांनीच नव्हे तर परदेशी इतिहासकारांनी सुद्धा वाघनखांच्या निर्मितीचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानले आहे व 1659 साली अफजलखान वधाच्या प्रसंगी या शस्त्राचा प्रथम वापर करण्यात आला होता. त्यानंतर ही वाघनखं ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांच्यामार्फत लंडनला पोहचले.
….अन् वाघनखं इंग्रजांच्या ताब्यात गेली –
ब्रिटीश राजवटीत डफ हा सातारा जिल्ह्यात कंपनीचा एजंट होता. वाघनख जेम्स ग्रँट डफच्या ताब्यात कसे आले याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, मराठ्यांचा शेवटचा पेशवा, दुसरा बाजीराव, तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पराभूत झाला, तेव्हा त्याने 1818 मध्ये इंग्रजांना शरणागती पत्करली.
या काळात त्याने वाघनख डफला सुपूर्द केले असावे, अशी शक्यता आहे. पेशवे पंतप्रधानांनीच डफला वाघनख दिल्याचा दावाही अनेक ठिकाणी केला जातो. जेम्स ग्रँट डफ जेव्हा भारतातून स्कॉटलंडला गेला तेव्हा त्याने वाघनखला सोबत घेतले. नंतर डफच्या कुटुंबाने ते लंडनच्या संग्रहालयाला भेट म्हणून दिले.
मात्र, आता हीच वाघनखं आपल्या मूळ जागी म्हणजेच, महाराष्ट्रात पुन्हा एकदा दाखल झाली आहेत. दरम्यान आपल्या भारतातील अश्या अनेक महत्वाच्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वस्तू आज देखील इतर देशांमध्ये संग्रहित करून ठेवल्या आहेत. आणि या ऐतिहासिक वस्तू आपल्या मूळ जागी कधी परत येणार याबद्दल अनेक इतिहास प्रेमी प्रश्न करत असतात.
ऐतिहासिक कलाकृती परत करण्याची प्रक्रिया –
तज्ज्ञांच्या मते, भारतातून बाहेर काढलेल्या या कलाकृती परत आणण्यासाठी दोन प्रक्रिया आहेत. कायदेशीर आणि मुत्सद्दी, यापैकी, कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत येणे केवळ किचकट नाही तर त्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.
ज्या वेळी भारताचा दबदबा जगभरात वाढत आहे, अशा वेळी ते या कलाकृती राजनैतिक प्रक्रियेद्वारे म्हणजे परस्पर वाटाघाटीद्वारे परत आणू शकतात. भारतातून परदेशात गेलेल्या ऐतिहासिक-पुरातत्वीय महत्त्वाच्या वस्तूंची नेमकी संख्या सांगणे कठीण आहे, अंदाजानुसार ही संख्या हजाराहून अधिक असल्याचं बोललं जात.
‘या’ ऐतिहासिक वस्तू आज सुद्धा आहेत भारताच्या बाहेर –
कोहिनूर हिरा: जगातील सर्वात सुंदर हिरा म्हणून आज सुद्धा याकडे पाहिलं जात. कोहिनूर हिरा 105.6 कॅरेटचा आहे. कोहिनूर हिरा कोणीही विकत घेतला नाही किंवा तो एका शासकाने दुसऱ्याला भेट म्हणून दिला नाही, असे म्हटले जाते की त्याची किंमत कित्येक अब्ज डॉलर्स मध्ये आहे.
हा हिरा भारतातील गोलकोंडा खाणीतून काढण्यात आल्याचे सांगितले जाते. ईस्ट इंडिया कंपनीकडे जाण्यापूर्वी ते 1849 मध्ये महाराणा रणजित सिंग यांच्या खजिन्यात होते आणि त्यानंतर ते ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियापर्यंत पोहोचले. हा हिरा सध्या ब्रिटीश राजघराण्याकडे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार: छत्रपती शिवाजी महाराजांकडे भवानी, जगदंबा आणि तुळजा या तीन तलवारी होत्या. या तीन तलवारींपैकी भवानी आणि तुळजा या तलवारींची माहिती नाही. या दोन्ही तलवारी सुमारे 200 वर्षांपासून बेपत्ता आहेत, तर सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये या तलवारी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
टिपू सुलतानचा वाघ: हे 18 व्या शतकातील स्वयंचलित खेळणी आहे जे म्हैसूर साम्राज्याचे शासक टिपू सुलतान यांच्यासाठी बनवले गेले होते. या खेळण्यामध्ये, एक वाघ एका मोठ्या आकाराच्या युरोपियन माणसाची शिकार करत असल्याचे चित्रित केले आहे, एक हँडल वर आणि खाली हलवून, वाघाच्या विविध यंत्रणा काम करू लागतात आणि त्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू येतो.
एक घुंगरू सैनिकाच्या गळ्याभोवती असलेल्या नळीतून हवा फुंकतो आणि रडण्याचा आवाज करतो. असे मानले जाते की टिपू सुलतानने वाघ हे त्याचे राज्य चिन्ह म्हणून वापरले होते आणि युरोपियन लोकांना त्याचे शिकार म्हणून वापरले होते. ही कलाकृती सध्या लंडनच्या संग्रहालयातही आहे.
महाराजा रणजीत सिंह यांचे सिंहासन: इंग्रजांनी त्यांच्यासोबत शिखांचे पहिले महाराजा रणजीत सिंह यांचे सिंहासन 1820-1830 च्या दरम्यान बांधले होते हे सिंहासन लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित केले आहे.
संगमरवरी सरस्वती मूर्ती: विद्येची देवी मानली जाणारी माँ सरस्वतीची संगमरवरी मूर्ती ब्रिटिश म्युझियममध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे, माहितीनुसार, 1034 मध्ये कोरलेली ही मूर्ती मध्य प्रदेशातील भोजशाला मंदिराचा एक भाग होती. शिल्पावरील शिलालेखात राजा भोज आणि वाग्देवी (सरस्वतीचे दुसरे नाव) यांचा उल्लेख आहे.
भगवान बुद्धाची मूर्ती: ही मूर्ती सुमारे दोन मीटर उंच आणि 500 किलोग्रॅम वजनाची आहे. 1862 मध्ये सुल्तानगंज रेल्वेच्या बांधकामादरम्यान ईबी हॅरिस (ब्रिटिश रेल्वे अभियंता) यांना बुद्धाच्या विशाल भारतीय धातूच्या मूर्तींपैकी ही एक मूर्ती सापडली होती. ही मूर्ती सध्या बर्मिंगहॅम म्युझियममध्ये आहे.













