waari : शहरातून वैष्णवांचा मेळा मार्गस्थ ; सासवड, लोणी काळभोर आज मुक्कामी
waari :

पंढरीची वाट धरिली, विठ्ठल नामे गजर केला !!
waari : शहरातील दोन दिवसांचा भक्तीमय मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे पालखी सोहळे शनिवारी (दि. ११) पहाटे पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमले होते.
पहाटे ६:०० वाजता दोन्ही संतश्रेष्ठांच्या पवित्र पादुकांवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर शितोळे सरकार यांच्या वतीने परंपरेनुसार मानाचा नैवेद्य दाखविण्यात आला. हे धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर सर्व मानाच्या दिंड्या पालखी तळाजवळ एकत्र आल्या.
आरती झाल्यानंतर दोन्ही पालख्यांनी हडपसरच्या दिशेने प्रस्थान ठेवले, त्यामुळे दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी पहाटे पासूनच रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती.
शहरातून पालख्या मार्गस्थ झाल्यावर शिंदे छत्री या ऐतिहासिक ठिकाणी पालखी सोहळ्याचा सकाळचा पहिला विसावा झाला. येथे वारकऱ्यांनी काही काळ विश्रांती घेतली, त्यानंतर दोन्ही पालख्या हडपसर येथील मुख्य चौकात आल्यावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दिवेघाट मार्गे सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाला.
तर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गे लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ झाला. दोन दिवस भक्तीरसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानानंतर भाऊक झाली.
उपमहापौरांकडून रथाचे सारथ्य…
पुणे महापालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दोन्ही पालखीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते काकड आरती झाली. त्यानंतर जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेत भवानी पेठ ते पुलगेट दरम्यान पालखी रथाचे सारथ्य वाडेकर यांनी केले. यावेळी देहू संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे महाराज यांच्या हस्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार पालखीचे स्वारस्य (मानाचा सन्मान) उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.





