सभामंडप कोसळल्याने तिघांचा मृत्यू ः 20हून अधिक जखमी
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवाला आज गालबोट लागले आहे. ही घटना 24 उत्तर परागना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरामध्ये दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली. या उत्सवासाठी उभारण्यात आलेला सभामंडप अचानक कोसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 20 जण जखमी झाले आहेत. या मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी मंदिरात लाखोंच्या संख्येने भावीक जमले होते. दरम्यान, पहाटेपासूनच मुसळधार पाउस सुरु होता. यामुळे दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी येथे उभारण्यात आलेल्या मंडपात आश्रय घेतला. सभामंडपात गर्दी झाल्याने अचानक सभामंडपाचा काही भाग कोसळली. यामुळे भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी सैरभर पळण्यास सुरूवात झाली. या ठिकाणी रस्ता रुंद असल्याने काही लोक मंदिराजवळील तलावात कोसळले आणि एकच गोंधळ उडाला. यावेळी उपस्थित पोलिसांनी काही भाविकांच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या सर्व दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20हून अधिक जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेबाबत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी संबंधित आधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख, तर गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रूपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे.