Boat Accident : वृंदावन येथे यमुना नदीत झालेल्या बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून १० वर पोहोचला आहे, तर ८ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Boat Accident) मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मथुरेतील शृंगार घाटाजवळ भाविकांनी भरलेली बोट उलटली. बोटीत एकूण ३३ भाविक होते. यामध्ये १५ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व भाविक पंजाबमधील असून बांके बिहारी मंदिर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर ते यमुना नदीत बोट सफरीसाठी गेले असताना हा अपघात घडला. पुलाला धडक बसल्याने बोट उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. (Boat Accident) घटनेनंतर पोलीस, डायव्हिंग पथक, तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. आतापर्यंत २५ जणांना पाण्याबाहेर काढण्यात आले असून उर्वरित बेपत्ता भाविकांचा शोध सुरू आहे. मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रताप सिंह यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांचा आकडा १० असल्याची पुष्टी केली. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. शृंगार घाट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. (Boat Accident)