Satara | विकासकामे पाहूनच मतदार मला मतदान करतील

पाटण, (प्रतिनिधी) – निवडणूक प्रचारासाठी मी मतदारसंघातील गावागावांत, वाडीवस्तीवर गेलो. तेथील लोकांचे माझ्यावरील प्रेम अनुभवले. गेल्या पाच वर्षांत प्रत्येक गाव, वाडीवस्तीचे रस्ते, पिण्याच्या पाण्याचा योजना केल्याची माहिती तेथील ग्रामस्थ इतरांना देत आहेत. मतदारसंघातील विकासकामांकडे पाहून, येथील मतदार मतदान करतात. त्यामुळे याही वेळी ते मला साथ देतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गट व महायुतीचे पाटण मतदारसंघाचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
देसाई यांच्या प्रचाराची सांगता सभा ढेबेवाडी येथे सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, आदित्यराज देसाई, माजी सभापती संजय देसाई, डॉ. दिलीप चव्हाण, भरत पाटील, मनोज मोहिते, ज्योतिराज काळे, विलास गोडांबे, पंजाबराव देसाई, शिवाजीराव शेवाळे, रणजित पाटील, अंकुश महाडिक, अनिल शिंदे, सागर नलवडे, कविता कचरे, धनाजी गुजर, दत्ता चोरगे, सचिन यादव, मधुकर पाटील, शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाइं आठवले व कवाडे गट, रयत क्रांती संघटना व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, विरोधकांना पाच वर्षे मतदारसंघातील गावे, वाड्या दिसत नाहीत. मात्र, निवडणूक आली की ते रिचार्ज होतात; परंतु यावेळी मतदारसंघातील जनता निष्क्रिय विरोधकांना थारा देणार नाही, याची खात्री आहे. पाटण मतदारसंघ विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत. पर्यटन विकासाला चालना द्यायची आहे. त्यासाठी आम्हाला साथ द्या.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, शंभूराज देसाई यांनी मतदारसंघाचा खर्या अर्थाने विकास केला आहे. त्यांचा स्वभाव जसा कडक आहे, तसेच कामही दमदार आहे. तालुक्याचा, जिल्ह्याचा कोणताही विषय त्यांच्याकडे घेऊन गेल्यास, ते स्वत: त्यात लक्ष घालतात. त्यामुळे त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा. दरम्यान, भोसगाव विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शंभूराज देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.





