पुणे | यापूर्वी अनेकदा मतदान, पण यावेळी नावच गायब

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतदान ओळखपत्र आहे, या आधी अनेकदा मतदान केले आहे. तरीही या यादीत नाव नाही, असे प्रकार अनेक मतदारांचे झाल्याने ते नाराज झाले तर अनेकांनी राग व्यक्त केला.
या आधीही बारामती मतदार संघाच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावेच गायब झाली होती. तोच प्रकार याही वेळी घडला. अनेक मतदार नेहमीच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव तपासत होते, मात्र काहींची नावेच त्यातून गायब झाली होती. त्यामुळे त्यांना मतदानच करता आले नाही.
त्यातून नाव नसले, तर फॉर्म १७ भरून मतदान करता येते अशी अफवा पसरवण्यात आल्याने अनेकांनी फॉर्म १७ आणि बॅलेट पेपरची मागणी केली, मात्र ती तरतूद नसल्याने मतदारांना निराश होऊन परत जावे लागले. ही तरतूद केवळ आपल्या नावावर बोगस मतदान झाले असेल तर त्याला चॅलेंज करण्यासाठी केली आहे. त्यामुळे त्यासाठी तो अर्ज भरून घेतला जातो.
आधी नाव तपासणे आवश्यकच
आपले नाव आहे की नाही याची खात्री मतदारांनी आधीच करून घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून यासाठी वेळोवेळी जाहीर प्रकटन देण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी स्वतंत्र तरतूदही केलेली असते, मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. ऐनवेळी नाव शोधून ते नसल्यास अधिकाऱ्यांना दोष दिला जातो.
आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र आहे, आपण या आधी अमुक अमुक शाळेत, मतदान केंद्रावर मतदान केले आहे तर आताही तेथेच असेल अशी समजूत अनेकांची होते. मात्र, त्याठिकाणी गेल्यावर फज्जा उडतो. त्यामुळे सरकारी प्रकटन आल्यानंतर आपले नाव प्रत्येकवेळी तपासणे हे कर्तव्य समजून करणे आवश्यक आहे.




